ग्रामीण भागातील उन्हाळी शेती लागवडीला मिळणार आधार
अंबरनाथ/ अशोक नाईक : अंबरनाथ तालुक्यातील येवे गावात गेल्या ११ वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या छोट्या धरणाचे नुकतेच स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या नव्या धरणामुळे १३९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.तसेच या धरणातील १० टक्के जलसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येईल. स्थानिकांना उन्हाळ्यात शेती, भाजीपाला पीक लागवड करण्यास येवे धरण लाभदायक ठरणार आहे.
अतिरिक्त पाण्याचा साठा होणे ही काळाची गरज ओळखून मतदारसंघात लहान धरणे उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यादृष्टीने अंबरनाथ तालुक्यातील येवे गावात लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले. या नव्या धरणामुळे शेतीसह गावांना पिण्याचे मुबलक पाणीही मिळणार आहे. त्यामुळे जवळपास १३९ हेक्टर जमीन आता ओलिताखाली येईल. त्यासाठी ११ कोटी२३ लाख रुपये खर्च येणार आहे.
जलसंधारण विभागाच्या माध्यमातून वन खात्याच्या परवानगीसह हा प्रकल्प मंजूर झाला असून आता या धरणाचे भूमिपूजनही झाले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात या धरणाचे काम पूर्ण होईल. पाण्याचा साठा झाल्यावर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून उर्वरित पाणी इतर गावांच्या पिण्याकरिता राखून ठेवता येईल. येवे गावातील धरण हे पहिले आहे. मुरबाड मतदारसघांत अशी १३ प्रकारची लहान धरणे बांधण्यात येणार असून भविष्यात मोठे धरण बाधंण्याची गरज भासणार नाही. लहान धरणे बांधण्यावर भर देण्याचे कारण असे आहे की, लहान धरणांमुळे कोणतेही गावं बाधित होत नाही. शिवाय लोकांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नसते. इतर धरणाचा मागोवा सुरूच राहणार आहे, त्यामुळे येत्या काळात पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटेल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यावेळी व्यक्त केलाआहे.
शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये मुंबई, ठाणे जिल्हा परिसराला पाणीपुरवठा करणारी मोठी धरणे आहेत. तरीही 'धरण उशाला आणि कोरड घशाला'अशा पाणीबाणी परिस्थितीत डवऱ्यातील पाणी शोधण्यासाठी होणारी भटकंती पाहता या छोट्या धरणांमुळे पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार आहे. मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर बारवी धरण परिसरातील गावातील रहिवाशांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कधी पाणी टँकरची वाट पाहावी लागते. त्यात अंबरनाथ तालुक्यातील येवे हे बारवी धरणालगतचे गाव आहे. येथील पिंपळोली गावाच्या हद्दीत बारवी धरण आहे. या बाबी धरण क्षेत्रात बॅक वॉटरमुळे परिसरातील शेतकरी बारामाही भाजीपाला, शेती करत असतात.