दिवा \ आरती परब : रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि विकास सारंगे (सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव) यांच्या वतीने प्रयोगात्मक कला शिबीर (दशावतारी प्रशिक्षण) रायगड जिल्ह्यामध्ये यश मंगल कार्यालयामध्ये १८ ते २८ मार्च रोजी संपन्न होत आहे. या शिबिराचे उद्घाटन उमा संदिप मुंडे (सरपंच वासांबे मोहोपाडा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला रायगड जिल्हा अध्यक्ष, तसेच वर्षा मनोहर पाटील (विभागीय अध्यक्ष) आणि माजी सभापती रमेश पाटील आणि गोपाल देऊळगांवकर (गुरुजी) तसेच श्री प्रासादिक भजन मंडळ सिंधुदुर्ग मोहोपाडा बुवा चंद्रकांत पास्ते आणि पुरुषोत्तम येरागी आणि संजय पेडणेकर, शिक्षक तसेच ओम वीरभद्र दशावतार भांडुप, मुंबईचे संचालक उमेश धुरी आणि स्त्री कलाकार पवन वालावलकर आणि शंकर वारंग, शिबीर प्रमुख गौतम कदम आणि नवीन विदयार्थी आणि दशावतारी प्रेमी उपस्थित होते.
कोकणातील ही पारंपरिक दशावतारी कला नवीन विद्यार्थ्यांनी शिकून ते कलाकार घडावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनाने दशावतारी कलेवर प्रेम करून हा आगळावेगळा उपक्रम प्रथमच रायगड जिल्ह्यामध्ये चालू केला आहे. दहा दिवस सदर शिबीर होणार आहे. तरी या शिबिरात रायगड जिल्ह्यातील नवीन कलाकारांनी सुद्धा सहभाग दाखवून दशावतारी कलेचा प्रसार, प्रचार, संवर्धन, हिंदू संस्कृतीचा वारसा जपावा असे आवाहन उमेश धुरी आणि पवन वालावलकर, शंकर वारंग, ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ भांडुप, मुंबईच्या सर्व कलाकारांनी केले आहे.