बदलापुरात थकबाकीदारांची यादी बॅनरवर झळकणार
अंबरनाथ/ अशोक नाईक : अंबरनाथ आणि कुळगाव- बदलापूर नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने गतवर्षीच्या तुलनेत १०० टक्के मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट पार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अंबरनाथ नगरपालिकेमार्फत थकीत मालमत्ता करधारकांना वेळोवेळी सूचना-आवाहन करून देखील बऱ्याच थकबाकीदारांनी कराचा भरणा न केल्याने अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. तर कुळगाव- बदलापूर नगरपालिकेने अखेर नाईलाजास्तव मालमत्ता कर थकीत असलेल्या थकबाकीदारांची रक्कम आणि नावांची यादी असलेले 'बॅनर्स' मंगळवारी चौका-चौकात झळकवली आहेत. त्यामुळे थकबाकीदार सैरभैर झाले असून 'थकीत कलंक' चर्चेला शहरात उधाण आले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगरपालिकेच्या उत्पन्नात कशी वाढ होईल, त्या अनुषंगाने आदेशानुसार करधीक्षक नरेंद्र संख्ये, प्रशांत राणे, नवनीत देवरे व संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर थकबाकी वसुली करिता विशेष मोहीम अंतर्गत प्रामुख्याने १ लाखांवर मालमत्ता कर थकीत आहे. अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार गेमनानी कंपाऊंडमध्ये १२ गोदाम सील करण्यात आले. तर आनंदनगर एमआयडीसीतील २ कंपन्यांना सील ठोकण्यात आले आहे. तसेच या कारवाई दरम्यान ३ मालमत्ता करधारकांनी जागेवरच धनादेशद्वारे भरणा केल्याची माहिती कर विभागातून देण्यात आली आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे 'बेधडक' मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी थकीत मालमत्ता करधारकांकडून मार्च अखेर पर्यंत १०० टक्के वसुली करण्यासाठी ५ विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली. वारंवार थकबाकीधारकांना कर भरण्यासाठी आवाहन करून देखील मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची रक्कम आणि नावासह यादी जाहीरपणे बॅनर्सद्वारे चौका-चौकात लावण्यात आली आहे.
बिल्डररांनी थकवले १.८६ कोटी रुपये
बदलापूर शहरात एकूण १ लाख २३ हजार २७३ रहिवासी मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी १४ हजार ३६५ वाणिज्य आणि ६४२ औद्योगिक अशा एकूण १ लाख ३८ हजार २८० मालमत्ता नोंदीत आहेत. मालमत्ता जप्तीच्या मोहिमे दरम्यान विशेष भरारी पथकाकडून ५२ मालमत्ता जप्त करत ६४ लाख १४ हजार ८९३ रुपये थकीत रक्कम वसुली करण्यात आली होती. मात्र १३ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरण्याची मुदत दिली होती. त्यानंतर थकबाकीदारांकडून कर भरणा मंदावली होती. दरम्यान बदलापूर पालिकेने बॅनरवर जाहीर केलेल्या यादीत १४५ थकबाकीदारांचा समावेश असून यामध्ये शहरातील ८ मोठ्या बांधकाम व्यवसायिकांकडे एकूण १ कोटी ८६ लाखांची थकबाकी झळकली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत हा मालमत्ता कर आहे. अंबरनाथकरांना सुख-सुविधा देताना, दर्जा चांगला राहावा, त्याकरिता पालिकेला नेहमीच निधीची आवश्यकता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात १ लाखांपेक्षा जास्त थकबाकीदार आहेत. त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदारांनी वेळेत कर भरणा करावा. वेळेवर न भरणा केल्यास त्यांच्यावर दंडात्मक शुल्क लागू होते. आतापर्यंत १२ मालमत्ता सील केल्या असून काही थकबाकीदारांनी कारवाई दरम्यान जागेवरच धनादेशाद्वारे भरणा करत आहेत. थकबाकीदार नागरिकांनी वेळीच मालमत्ता कर भरणा करून सहकार्य करावे.