जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांचे प्रतिपादन
कोल्हापूर \ शेखर धोंगडे : ग्राहकांनी सजग राहून सदसद्विवेकबुद्धीचा वापर केला तर फसवणूक टळेल असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले. कमी तेच अधिक मानून, अधिकचे न मिळवता, आहे त्यावरच समाधान मानून कोणत्याही अमिषाला बळी पडू नका असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. त्या म्हणाल्या, ऑनलाईन विश्वासाठी आपण सावज असून, मोबाईलवर येणारी प्रत्येक लिंक समजून घेवून त्याबाबत खबरदारी घ्या. जेणेकरून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही. एआयमुळे ग्राहकांच्यापुढे अनेक आव्हाने उभी आहेत असून अधिकच्या मोबदल्यासाठी ग्राहकांची फसवणूक वाढत गेल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी सभागृहात दरवर्षी होणाऱ्या १५ मार्चच्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या सहभागाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रविण खोत यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध साधनसामग्रीचा विचार केल्यास वेळ आणि मनुष्यबळ अधिकचे आवश्यक असल्याचे सांगितले. ते यावेळी म्हणाले, फसवणूक करणारा हा ग्राहकांच्या चार पावलं पुढेच असतो. अशिक्षितांबरोबरच शिक्षितही त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीमध्ये किंवा विविध अमिषांना बळी पडत आहेत. ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे अरुण यादव यांनी फसवणुकीनंतर न्याय मिळविण्यासाठी कोणतेही साहित्य, सेवा खरेदी केल्यानंतर त्याची पावती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्राहकांनी वाद विवाद टाळून विहीत पद्धतीने फसवणूक प्रकरणातील वाद मिटवावेत असेही आवाहन केले.
कमलाकर बुरांडे यांनी ग्राहक संरक्षण कायदा फक्त पैसे देऊन सेवा किंवा वस्तू खरेदी केल्यानंतरच लागु असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी यावेळी सजग ग्राहक ही संकल्पना सांगितली. जगदीश पाटील यांनी विविध क्षेत्रातील ग्राहकांची झालेली फसवणूक याबाबत उदाहरणे सांगून प्रत्येकाचीच एकदातरी आयुष्यात फसवणूक होत असल्याचे सांगितले. अजित देसाई यांनी ग्राहकांचे आठ मुलभूत हक्क सांगून सायबर गुन्हेगारी सांगितली. ॲड.सुप्रिया दळवी यांनी ग्राहाकांसाठी मदत करणाऱ्या ई-जागृती डॅशबोर्ड व जागृती ॲप बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे आभार डॉ.रवी मोरे यांनी मानले तर प्रकाश महाडेश्वर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दरवर्षी १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो, ज्याचा उद्देश ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांचे संरक्षण करणे आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्कांबद्दल माहिती देणे. वस्तू आणि सेवांची गुणवत्ता, शुद्धता आणि प्रमाण याबद्दल जागरूकता वाढवणे. ग्राहकांना फसवणूक आणि गैरवापर पासून संरक्षण देणे हा आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने 'ग्राहक संरक्षण कायदा-2019 लागू केला आहे. यंदाच्या जागतिक ग्राहक हक्क दिनाची थीम "शाश्वत जीवनशैलीकडे योग्य प्रकारे संक्रमण" (A just transition to sustainable lifestyles) अशी आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष प्रविण खोत, अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ॲड.सुप्रिया दळवी, ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे अरुण यादव, प्रांत ग्राहक संघटनेचे अजित देसाई, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे बाबासाहेब पाटील, ग्राहक हित संरक्षण संघटनेचे जगदीश पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कमलाकर बुरांडे यांच्यासह विविध पुरवठादार, ग्राहक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी पुरवठा विभागातर्फे विविध स्टॉल उभारण्यात आले होते.