वंचित बहुजन महिला आघाडीच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज


रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याविरोधात निषेध मोर्चा, अनेक महिला कार्यकर्त्या जखमी; प्रकाश आंबेडकर यांचा तीव्र निषेध

मुंबई :  डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी वक्तव्याच्या विरोधात आज वंचित बहुजन महिला आघाडी मुंबईच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चादरम्यान राज्य सरकारने पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, आंदोलन दाबण्यासाठी पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मारहाण करून ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या दरम्यान अनेक महिलांचे कपडे फाटले, तर मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष स्नेहल सोहनी यांच्या हाताला दुखापत झाली. मोर्चादरम्यान झालेल्या धक्काबुककीत महिलांशी अमानुष वर्तणूक झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

या घटनेत राज्य प्रवक्ता आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षाताई रूपवते, तसेच मुंबई महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांसह अनेक महिला पदाधिकारी जखमी झाल्या आहेत.

वंचित बहुजन महिला आघाडीने यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली होती की, महिलांबद्दल सातत्याने असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्यात यावे.

राज्य सरकारच्या या पोलिस कारवाईचा वंचित बहुजन आघाडीकडून आणि पक्षप्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी सांगितले की, “महिलांच्या सन्मानासाठी लढणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाते, हे लोकशाहीला शोभणारे नाही.”






Post a Comment

Previous Post Next Post