महिलांनी जेसीबी समोर येऊन थांबविली कारवाई
दिवा \ आरती परब : दोन वेळा प्रयन्त करूनही दिव्यातील अनधिकृत अनंत पार्क इमारतीवर ठाणे महापालिकेला कारवाई करता आलेली नसून मंगळवारी देखील कारवाई करायला गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमण पथकाला नागरिकांच्या रोषामुळे कारवाई न करताच मागे परतावे लागले आहे. पालिकेच्या कारवाई दरम्यान इमारतीमधील नागरिकांनी, महिलांनी, लहान मुलांनी पुन्हा एकदा जोरदार निदर्शने करत पालिकेच्या पथकाला परत जाण्यास भाग पाडले. काही नागरिकांनी, महिलांनी तर थेट जेसीबी समोर येऊन आत्महत्या करण्याचा इशाराच प्रशासनाला दिला. आक्रमक झालेल्या नागरिकांच्या पुढे प्रशासन पुन्हा एकदा हतबल झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
दिव्यातील अनंत पार्क इमारतीवर कारवाई होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी या कारवाईच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाच्या कारवाई दरम्यान इमारतीवर रहिवाशांनी प्रतिकात्मक फाशीचा दोर लावून व महिलांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन पालिकेच्या कारवाईला विरोध करण्यात आला होता. आम्हाला बेघर केलं तर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी, महिलांनी दिला होता. तर लाडक्या बहिणींना बेघर करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करत असल्याचेही या महिलांनी सांगितले होते.
तर आज पालिका अधिकाऱ्यांच्या प्रतीकात्मक तिरड्या बांधून अनंत पार्कच्या रहिवाशांकडून निषेध नोंदवला गेला. पालिकेच्या या कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मिळावा यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासना सोबत चर्चा सुरू केली आहे. त्याचबरोबर इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्याचेही नियोजन आखले आहे, मात्र दिव्यातील अनंत पार्क या इमारती वरील कारवाईला नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शवला असल्याने या ठिकाणी अद्याप पालिका प्रशासनाला कारवाई करता आलेली नाही.
दोन वेळा कारवाई करायला गेलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला नागरिकांच्या विरोधामुळे कारवाई न करताच हात हलवत परतावे लागले होते. मंगळवारी देखील या इमारतीवर कारवाई करण्याचा प्रयन्त प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र जेसीबीच्या समोरच महिला, नागरिक उभे राहिल्याने पालिकेला कारवाई करता आली नाही. तर यावेळी नागरिकांनी प्रशासनाची प्रतीकात्मक तिरडी देखील तेथे ठेवली होती. उच्च न्यायालयाचे आदेश नसताना पालिकेने दडपशाहीने कारवाई केली, तर आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचा इशारा यावेळी रहिवाशांकडून देण्यात आला.