जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी 'माझं कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर' संकल्प करुया



  •  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन 
  • जिल्ह्यातील ३५९ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त,
  •  ५० ग्रामपंचायती रौप्य (सिल्वर) 
  •  ३०९ ग्रामपंचायतींना कांस्य (ब्राँझ) प्रमाणपत्र


कोल्हापूर \ शेखर धोंगडे : जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने क्षयरोग मुक्तीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 359 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. यामध्ये 50 ग्रामपंचायतींना रौप्य (सिल्वर) तर 309 ग्रामपंचायतींना कांस्य (ब्राँझ) प्रमाणपत्र मिळाले आहे. येत्या काळात जिल्ह्यातील ग्रामपंचायती सुवर्ण (गोल्डन) प्रमाणपत्रासाठी पात्र होतील, असा विश्वास व्यक्त करुन जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी संकल्प करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.


  जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सोमवारी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजीत सिल्वर मेडल विजेत्या क्षयमुक्त ग्रामपंचायतींच्या सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. हेमलता पालेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव ठाकूर, डॉ. परवेज पटेल, डॉ. नितीन कुंभार, निक्षय मित्र, सर्व सिल्वर ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.



जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, क्षयरोग ही देशासमोरील मोठी समस्या आहे. तरुणांमध्ये क्षयरोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. आपला देश हा तरुणांचा देश असून देशातील तरुण आणि सर्व नागरिक निरोगी राहणे आवश्यक आहे. भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे आवाहन देशाच्या पंतप्रधानांनी केले आहे. क्षयरोग मुक्तीसाठी प्रत्येक क्षयरोग रुग्णांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांना उपचाराच्या प्रक्रियेत आणण्यात आपण यशस्वी झालो आहे. ही प्रक्रिया अशाच पध्दतीने पुढे चालू राहील. क्षयरोग मुक्तीसाठी आरोग्य विभागाला नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायतींचे सहकार्य महत्त्वाचे असणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनातून पुढील काळात अधिकचे काम करुन कोल्हापूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन त्यांनी केले.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी क्षयमुक्त कोल्हापूर करण्यासाठी पुढील वर्षी जास्तीत जास्त ग्राम पंचायती पात्र होतील, असे नियोजन सर्वांनी करण्याचे आवाहन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी 'माझं कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर ' संकल्प करण्यासाठी साईन बोर्ड, 'स्टँडी फलक, टीबी प्रोटोकॉल चार्टचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निक्षय मशाल प्रज्वलित करुन प्रथम क्रमांक पटकाविलेल्या तालुका युनिट कागल चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फारुक देसाई यांच्याकडे निक्षय मशाल सुपूर्द केली. यावेळी क्षयमुक्तीची शपथ सर्वांना देण्यात आली. ' माझं कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर ' चे बोर्ड सर्व मान्यवरांनी हातात घेऊन क्षयमुक्तीचा संकल्प केला.




डी मार्ट फाउंडेशन मुंबई यांनी 500 तर मेनन पिस्टन्स लि.पुलाची शिरोली यांनी निक्षय मित्र होऊन प्रत्येकी 500 क्षयरुग्णांसाठी 6 महिन्यांकरिता पोषण आहार दिला तर इंडोकाउंट फाउंडेशन - गोकुळ शिरगाव यांनी 650 क्षयरुग्णांसाठी 6 महिन्यांकरिता पोषण आहार किट प्रदान केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सर्व स्पर्धा विजेत्यांचा व संस्थांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नामदेव सावंत, अर्चना देसाई यांनी केले.


स्पर्धा विजेते - उत्कृष्ट क्षयरोग पथक - कागल (प्रथम) , हातकणंगले,(द्वितीय) राधानगरी (तृतीय) उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र- आंबा (प्रथम), उत्तूर,(द्वितीय), आळते (तृतीय) उत्कृष्ट रुग्णालय- गडहिंग्लज , गारगोटी

उत्कृष्ट खाजगी वैद्यकिय व्यावसायिक- पायोस मेडीलिंक्स प्रा.लि.,जयसिंगपूर चौधरी हॉस्पिटल, जयसिंगपूर, खाजगी औषधे विक्रते श्री स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर्स, इचलकरंजी

आरोग्य कर्मचारी यांची क्षयरोग जनजागृतीपर लघुकथा /निबंध लेखन स्पर्धा - निकाल - ऐश्वर्या चौगले - औषध निर्माण अधिकारी(प्रथम) , मोहन जांभळे - पद -आरोग्य सेवक ,(द्वितीय) स्मिता चोपडे - पद -आरोग्य सहाय्यीका (तृतीय),

समुदाय आरोग्य अधिकारी (सी.एच.ओ.) यांची क्षयरोग जनजागृतीपर शॉर्ट व्हीडीओ /रील निर्मिती स्पर्धा निकाल - डॉ.सोनल जाधव -उपकेंद्र -हालोंडी,ता.हातकणंगले, (प्रथम) डॉ.कोजागिरी देसाई - उपकेंद्र -मिणचे खुर्द, ता.भुदरगड, (द्वितीय) डॉ.दीपक केसरकर -उपकेंद्र -तुरंबे , (तृतीय),

आशा स्वयंसेविका/ गटप्रवर्तीका यांची क्षयरोग जनजागृतीपर कविता /गीत लेखन स्पर्धा निकाल - :- विद्या लोखंडे, (प्रथम) सीमा पाटील ,(द्वितीय), नंदा फर्जंद (तृतीय)

१०० दिवसीय क्षयरोग मोहीम अंतर्गत उत्कृष्ट आयुष्मान आरोग्य मंदिर (उपकेंद्र) - भादवण, कानुर बुद्रुक, वाघराळी, असंडोली, कलनाकवाडी, मिणचे, अर्जुनवाडा, वडणगे, बोरीवडे, नरतवडे, गोगवे, उमळवाड उत्कृष्ट यु.पी.एच.सी.- तांबे माळ




Post a Comment

Previous Post Next Post