आरटीओ अधिकारी संजय भोर यांचा कडक इशारा
कोल्हापूर \ शेखर धोंगडे : कोल्हापूरमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. याप्रकरणी एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत १३,३८८ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, मोबाईल वापर आणि ओव्हरस्पीडिंग यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या कारवाईत एकूण ४९.५० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत हेल्मेट न घालण्याच्या ५५३६ प्रकरणांवर ९.२४ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. सीट बेल्ट न लावण्याच्या १९९८ प्रकरणांवर ५.०७ लाख रुपये दंड लावण्यात आला आहे. मोटारसायकल चालवताना मोबाईल वापरण्याच्या २५०५ प्रकरणांवर २.३१ लाख रुपये दंड लावण्यात आला आहे. वेगमर्यादा ओलांडण्याच्या (ओव्हरस्पीडिंग) ३३४९ प्रकरणांवर ३२.८८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
या संदर्भात कोल्हापूर RTO संजय भोर यांनी सांगितले की, "वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. नियम न पाळल्याने अपघात वाढत आहेत, त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. विशेषत: हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर सक्तीने करावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल."
वाहतूक पोलीस आणि RTO विभागाने येत्या काळात ही कारवाई आणखी कठोर करण्याचा इशारा दिला आहे. स्मार्ट कॅमेरे आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे वाहनचालकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोल्हापूरमधील अनेक नागरिकांनी या कठोर कारवाईचे समर्थन केले आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे, असे स्थानिक रहिवाशांचे मत आहे. याचबरोबर, वाहतूक पोलीस आणि RTO विभागाने अधिक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी काही वाहनचालकांनी केली आहे.
