छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानचे अभिवादन

 



कोल्हापूर \ शेखर धोंगडे : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले. गुरुवारी (दि. ३ एप्रिल २०२५) सकाळी टाऊन हॉल म्युझियमच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात विविध उपक्रम राबवण्यात आले.


सकाळी ८ वाजता स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर स्मारक फुलांच्या माळांनी सजवण्यात आले. महाराजांच्या मूर्तीस जलाभिषेक करून विधिवत पूजन व पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी स्तब्धता पाळून छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली अर्पण केली.


या कार्यक्रमाला शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, उपाध्यक्ष योगेश रोकडे, मनिष बडदारे, संदीप पाडळकर, महेश खाडे, प्रवीण कुरणे, प्रशांत पाटील, तुषार मोरे, प्रशांत जाधव, रणजीत सुतार, प्रफुल्ल भालेकर, तानाजी इंगळे, सुजय भोसले, सचिन ससे, राजाराम संकपाळ यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव यांनी सांगितले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या विचारांतून सामाजिक एकता, स्वाभिमान आणि न्यायप्रिय प्रशासनाचा संदेश मिळतो. त्यांच्या स्मृती जपणे ही आपली जबाबदारी आहे."


शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी शिवरायांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात. यंदाही सामाजिक बांधिलकी जपत स्मारक स्वच्छता, अभिषेक व अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



Post a Comment

Previous Post Next Post