डॉ. बाबासाहेबांचा विचार हा मानव कल्याणाचा विचार


  व्याख्याते प्रा.डॉ.हरीश वानखेडे यांचे मत 

नवी मुंबई :   डॉ. बाबासाहेबांचा विचार हा मानव कल्याणाचा विचार असून समर्थ राष्ट्रनिर्माणासाठी सामाजिक न्यायाचे धोरण राबवितांना त्यांनी सर्वांच्या समान हक्कासाठी पुढाकार घेतला. संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विशेषत्वाने महिलांना समानतेचा हक्क देण्याची जगातील पहिली सुरुवात भारतापासून केली हे त्यांचे कार्य क्रांतीकारी असून जातीअंताचा लढा हा स्वराज्याचा लढा आहे ही त्यांची भूमिका द्रष्टेपणाची असल्याचे मत सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. हरीश वानखेडे यांनी व्यक्त केले.


          नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पंधरवडा कालावधीत राबविण्यात येणा-या ‘जागर२०२५’ या व्याख्यानमालेतील  ‘सामाजिक न्याय व समानता’ हे शुभारंभाचे व्याख्यानपुष्प सुप्रसिध्द लेखक, व्याख्याते डॉ. हरीश वानखेडे यांनी गुंफले.


        डॉ.  बाबासाहेबांनी समाज कल्याणासाठी ज्ञानाचा महामेरु उभारला. ब्रिटीश गुलामगिरीतून बाहेर आलेला देश समर्थ करण्यासाठी बहुआयामी लेखन केले. विकासाच्या सर्व क्षेत्रात मौलिक विचार मांडले. लोककल्याणकारी राष्ट्राची संकल्पना मांडताना आर्थिकदृष्टया सक्षमतेसाठी प्रभावी दिशा दिली. बौध्द धर्म स्विकारताना समानतेचा विचार हेच त्यांचे प्रमुख लक्ष्य होते.  त्यानुसार डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची ४ सूत्रे त्यांनी सांगितली. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला संविधान प्रेरीत मौलिक समान अधिकार, पारंपारिक यंत्रणेत बदल घडविणे त्यासाठी सामाजिक न्यायाची सूत्रे व धोरणे राबविणे, राज्याची अंमलबजावणी क्षमता वाढविणे व त्यासाठी प्रतिनिधीत्व सुनिश्चित करणे तसेच सामाजिक क्रांतीची गरज या डॉ. बाबासाहेबांच्या विचारप्रणालीतील ४ प्रमुख सूत्रांवर डॉ. हरीश वानखेडे यांनी सविस्तर भाष्य केले.


          सामाजिक न्यायाची  लढाई ही एक पायरी असून बाबासाहेबांच्या मते निम्न स्तरातील व्यक्ती अधिकार स्तरावर पोहोचणे हा या समानतेच्या सूत्रातील वरचा स्तर असल्याचे मत डॉ.हरीश वानखेडे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेबांचे सामाजिक न्याय व समानतेविषयीचे विचार व आंबेडकरी तत्वज्ञान त्यांनी विविध उदाहरणे देत उलगडून सांगितले. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतून डॉ. बाबासाहेबांचे विचार अभ्यासपूर्ण शैलीत मांडताना उपस्थित श्रोत्यांनी त्यांना योग्य ठिकाणी टाळयांची दाद दिली. डॉ. बाबासाहेबांच्या समानतेच्या विचारांचे सार त्यांनी अतिशय सोपे करुन सांगितले.





          नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे डॉ. बाबासाहेबांची वैचारिक उत्तुंगता समजून घेण्यासाठी अत्यंत सुयोग्य स्थान असून इथे आल्यानंतर भारावल्यासारखे होते अशा शब्दात व्याख्याते डॉ.हरीश वानखेडे यांनी स्मारकाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. येथील ग्रंथालय ही सर्वात महत्वाची उपलब्धी असल्याचे सांगतानाच त्यांनी येथील संग्रहालयातील डॉ. बाबासाहेबांची दूर्मिळ छायाचित्रे पाहताना बाबासाहेब आणखी समजत जातात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकापासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना हे स्मारक नवी ऊर्जा देते असे ते म्हणाले.


          भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विभागप्रमुख उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी जयंती महोत्सवानिमित्त जागर व्याख्यानमाला आयोजित करण्याबाबत नागरिकांकडूनच विचारणा होत होती, याबद्दल समाधान व्यक्त केले. आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीही जागरच्या माध्यमातून नानाविध उपक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले व उत्तम प्रतिसादाबद्दल आभार मानले.


         ‘जागर २०२५’ मधील दुसरे व्याख्यानपुष्प शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी सायं. ६.३० वा., सुप्रसिध्द साहित्यिक, कवी,व्याख्याते प्रा.प्रवीण दवणे  हे ‘युवकांचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर गुंफणार असून याप्रसंगी श्रोत्यांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.








Post a Comment

Previous Post Next Post