बेबी इनाराच्या उपचारांसाठी दात्यांकडून जमवलेले पैसे हडप केल्याचा होता आरोप
मुंबई : मुंबई पोलिसांच्या माटुंगा पोलीस ठाण्याने मजिस्ट्रेट कोर्ट, कुर्ला येथे समरी बी रिपोर्ट सादर केला आहे, ज्यामध्ये इम्पॅक्ट गुरुचे सह-संस्थापक आणि सीईओ पीयूष जैन तसेच बेबी इनारा यांचे पालक नौफिल काझी आणि निखत खान यांच्यावरील खोट्या आरोपांना पूर्णतः फेटाळण्यात आले आहे. पोलिसांना या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळले नाही. सादर केलेल्या समरी बी रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की ही तक्रार पूर्णपणे खोटी होती.
फेब्रुवारी २०२४ मध्ये आरिफ शेख नावाच्या एका व्यक्तीने कुर्ला येथील न्यायिक मजिस्ट्रेट कोर्टात एक निराधार तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये इम्पॅक्ट गुरुचे सीईओ आणि बेबी इनारा यांच्या पालकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांनी असा खोटा आरोप केला की इनाराला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी हा आजारच नाही, जरी त्यांनी त्यांच्या तक्रारीसह तिच्या वैद्यकीय कागदपत्रांची जोड दिली होती. त्यांनी हा खोटा दावा देखील केला की इनाराला पी. डी. हिंदुजा रुग्णालयात कधीच भरती करण्यात आले नव्हते. प्रत्यक्षात, इनाराला २० सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत डॉ. नीलू देसाई यांच्या देखरेखीखाली आणि नंतर १६ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत डॉ. रंजी सौम्या यांच्या देखरेखीखाली पी. डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तसेच, आरिफ शेख यांनी असा खोटा दावा केला की इम्पॅक्ट गुरुच्या प्लॅटफॉर्मवर ४.५ कोटी रुपये जमा झाले होते, परंतु प्रत्यक्षात २.२५ कोटी रुपयांचीच मदत जमा झाली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या समरी बी रिपोर्टनुसार, तक्रारदाराने त्याच्या कोणत्याही दाव्याचा आधार देणारे कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. हे आरोप केवळ खोटेच नव्हते, तर एक प्रकारचे भ्रमात्मक होते. स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफीचा उपचार कसा केला जातो, रुग्णालयातील प्रोटोकॉल्स काय असतात आणि औषधांची खरेदी कशी होते याचे चुकीचे चित्रण करण्यात आले. तसेच, न्यायालयात मुद्दाम पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाला. यामागचा उद्देश एक गरजू आणि महत्वाच्या फंडरेझिंग मोहिमेला अडथळा आणणे आणि इम्पॅक्ट गुरु व सीईओ पीयूष जैन यांची प्रतिमा मलिन करणे, असा स्पष्टपणे दिसतो.
इम्पॅक्ट गुरुचे सह-संस्थापक आणि सीईओ पीयूष जैन म्हणाले, “आम्ही माटुंगा पोलीस ठाण्याच्या चौकशीत पूर्ण सहकार्य केले. वेळेवर आणि सखोल चौकशीनंतर, आता अहवाल न्यायालयात दाखल झाल्याची माहिती मला मिळाली आहे. आम्ही न्यायप्रक्रियेचा सन्मान करतो. या निराधार आरोपांमुळे इनाराच्या फंडरेझिंग मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर मोहिमेत फारच नगण्य मदत जमा झाली आहे, ज्यामुळे दात्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. अशा कठीण प्रसंगी इनारासाठी पुढे येऊन आवाज उठवणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सोनू सूद यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आम्ही तक्रारदाराविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करू, जेणेकरून भविष्यात कोणत्याही निरपराध, गंभीर आजाराने ग्रस्त बालकाच्या जीवनाशी कुणी खेळ करू धजावणार नाही.”
नौफिल काझी आणि निखत खान म्हणाले, “आमच्या लेकी इनाराचे आयुष्य धोक्यात आहे, पण तक्रारदार आरिफ शेख यांनी खोटे आरोप करून तिच्या जीवनरक्षणासाठी सुरू असलेली फंडरेझिंग मोहिम अडवण्याचा प्रयत्न केला. हे एकप्रकारे तिच्या हत्येचा प्रयत्नच आहे कारण उपचार व आर्थिक मदत न मिळाल्यास तिचे आयुष्य धोक्यात आहे. आम्ही कायदेशीर लढा पूर्ण ताकदीने लढू आणि हे सुनिश्चित करू की या चुकीच्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा होईल. आम्ही सर्व दात्यांचे मनापासून आभार मानतो, जे इनारासाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.”
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांनी देखील १८ मार्च २०२४ रोजी इनाराच्या जीवनासाठी सुरू झालेल्या फंडरेझिंग मोहिमेला समर्थन दिले होते. खोटे आरोप समोर आल्यानंतरही, त्यांनी १७ डिसेंबर २०२४ रोजी एक व्हिडीओ संदेश देत आपले समर्थन कायम ठेवले. इम्पॅक्ट गुरु व इनाराचे पालक यांनी त्यांच्या या ठाम पाठिंब्यासाठी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
