चिपळूण नगर परिषद व लोकमान्य टिळक व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांचा पुढाकार
शेखर धोंगडे \ चिपळूण : मोबाईल बाजूला ठेवून नवी पिढी वाचनाकडे वळावी, यासाठी चिपळूण नगर परिषदेने सुरू केलेल्या “वाचू आनंदाने” या उपक्रमाचा रविवारी सकाळी श्री देव गांधारेश्वर मंदिर परिसरात शुभारंभ झाला. शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच इतर अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवत दोन तास वाचनामध्ये रचल्याचे चित्र पहावयास मिळाले. या उपक्रमाच्या समारोपाला मोबाईलपेक्षा आज पुस्तक वाचून मला खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र हायस्कूलच्या एका विद्यार्थिनीने दिली. अत्यंत वेगळ्या अशा उपक्रमाबाबत सर्वांनी व्यक्त केलेला आनंद या उपक्रमाविषयी खूप काही सांगणारा होता.एकूण १५६ वाचकांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला
दर रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी निसर्गाच्या सानिध्यानात येऊन वाचावे, असा हा उपक्रम आहे. चिपळूण नगर परिषदेने शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि यावर्षी रोप्य महोत्सव साजरा करणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या सहयोगाने हा उपक्रम सुरू केला आहे. श्री देव गांधारेश्वर मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात सकाळी आठ वाजता या उपक्रमाचा ग्रंथ पुजनाने शुभारंभ झाला.
मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी प्रास्ताविक करताना या उपक्रमामागील हेतू सांगितला. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन काही दिवसापूर्वी चिपळूणला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रमालाआल्या होत्या त्यावेळी त्यांनी वाचन संस्कृती टिकावी, यासाठी तुम्ही काही उपक्रम राबविला तर तो मलाही सांगा, मीही आमच्या भागात असा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करेन, असे सांगितले. ग्रंथालयात, कपाटात असणारी पुस्तके नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजेत, अशी त्यांची भावना होती आणि याच हेतूने तसेच मुख्याधिकारी विशाल भोसले व पत्रकार योगेश बांडागळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
वाचल्यामुळे काय होतं, असे अनेकजण म्हणतात, परंतु त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, वाचल्यामुळेच मुळेच सगळं होतं. वाचल्यामुळेच कलेक्टर होता येते, असे उदाहरणे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली. साहित्यिक, विचारवंत प्रकाश देशपांडे यांनी अत्यंत समर्पक शब्दात जीवनात वाचन किती आवश्यक आहे, हे सांगितले. मोबाईलमध्ये अडकलेल्या नव्या पिढीला यातून बाहेर काढून वाचनाकडे वळवण्यासाठी सर्वांनी वाचू आनंदाने या उपक्रमाला सहकार्य करायला हवे, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाला प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी भेट दिली. तेही या उपक्रमात सहभागी झाले आणि वाचनात दंग झाले. समारोपाच्या वेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी सविस्तर विवेचन केले. वाचनाचे महत्त्व विद्यार्थी पालकांना पटवून दिले. वाचनामुळेच मी घडलो. वाचनामुळेच, अभ्यासामुळेच एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आलो, असेही त्यांनी टाळ्यांच्या कडकड्यात सांगितले. लॉकडाउनच्या काळात अनेक पुस्तक वाचली. त्याचा आज फायदा होत आहे, असे सांगताना किमान रोज ३० पाने वाचा, नियमित चाला, आरोग्याची काळजी घ्या, फळे खा, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
प्रदूषण मुक्तीसाठी मुख्याधिकाऱ्यांनी एक दिवस सायकल चालवू किंवा चालत प्रवास करू, असा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सुरू केला आहे. आता हा वाचनाचा उपक्रम सुरू केला आहे. नगर पालिकेच्या या उपक्रमांना आता सर्व नागरिकांनी साथ देण्याची गरज असल्याचे माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी सांगितले.
पुढील रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत साने गुरूजी उद्यान या ठिकाणी वाचू आनंदाने हा उपक्रम घेण्यात येणार आहे, तरी सर्वांनी या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी, नागरिक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन चिपळूण नगर परिषद व वाचनालयामार्फत करण्यात येत आहे. साहित्यिक, संशोधक प्रकाश देशपांडे, लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष कवी राष्ट्रपाल सावंत, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ पूजन करण्यात आले.



