१०-१२ अज्ञातांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अंबरनाथ/ अशोक नाईक : अंबरनाथ मधील भाजपचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या कार्यालयावर दहा ते बारा अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास हातात नंग्या तलवारी घेऊन कार्यालयाच्या काचा फोडून कार्यालयात घुसून कार्यातील कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला केला. मात्र त्याने तिथे असलेल्या खुर्च्यांचा आधार घेऊन हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही झाली आहे. अवघ्या काही सेकंदात हल्ला करून हल्लेखोर आल्या मार्गे पसार झालेत. या प्रकरणी उशिराने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन रोड, स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी, भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांचे कार्यालय आहे. शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले १० ते १२ अज्ञात हल्लेखोरानी तलवारीने वार करून कार्यालयाच्या काचा फोडून आतमध्ये घुसून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणावर देखील जोरदार हल्ला चढवला. तलवारीने वार करून कार्यालयाची नासधूस केली. दरम्यान अंबरनाथ शहरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
रात्री सव्वा दहा वाजता मी आणि माझे वडील घरी गेल्यानंतर दहा मिनिटांनी कॉल आला. तुमच्या कार्यालयावर १० ते १५ जण तलवार घेऊन हल्ला करायला आलेले आहेत. तुम्ही जिथे असाल तिथेच राहा. आम्ही आल्यानंतर पाहिलं तर संपूर्ण कार्यालयाची तोडफोड केली होती. आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी राग-रुसवा ठेवून कोणीतरी कट रचलाय. कुठेतरी आम्ही समाज विकास करण्यात यशस्वी होतोय, कुणीतरी आम्हाला समाजाची सेवा करण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. या हल्लेखोरांना कठोर शिक्षेची कारवाई झाली पाहिजे, अशी आमची पोलिसांकडे मागणी असल्याचे भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांनी सांगितले.


