Diva news : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दिव्यात व्यापारी संघटनेचा कडकडीत बंद

 


कोपर \ आरती परब :  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दिवा शहरातील दिवा मर्चंट सेवा संस्था या व्यापारी संस्थेमार्फत दिवा शहरमध्ये बंदची हाक आज आली होती. व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील यांनी व्यापाऱ्यांना केलेल्या आवाहनानंतर दिवा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.


 

दिवा शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दिवा स्टेशन ते मुंब्रा देवा कॉलनी, दातिवली रोड, गणेश नगर ते दिवा टर्निंग पर्यंत निषेध रॅली काढून दहशतवाद्यांचा निषेध केला. दिवा शहरातील व्यापाऱ्यांनी पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करत पाकिस्तानचा झेंडा जाळला. त्याचबरोबर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना व्यापारी संघटनेच्या वतीने मेणबत्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २८ भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले होते. यानंतर देशभरात या दहशतवादी कृत्याबद्दल संताप व्यक्त होत असतानाच शुक्रवारी दिवा शहरात दिवा मर्चंट सेवा संस्था या व्यापारी संस्थेच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.



 व्यापारी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी दिवा शहरातील सर्व दुकानदार व व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला दिवा शहरातील दुकानदार, व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दिवा शहरात कडकडीत बंद पाळत दहशतवादी कृत्याचा निषेध केला. त्याचबरोबर हा हल्ला घडवून आणणाऱ्या पाकिस्तानचा व दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याची मागणी यावेळी दिवा शहरातील व्यापारी व दुकानदारांनी केली. तसेच संपूर्ण दिव्यात कोणत्याही पक्षा मार्फत बंद न ठेवता फक्त दिव्यातील व्यापारी संघटनेने मृतांना ही श्रद्धांजली वाहून कडकडीत बंद ठेवला होता. त्यावेळी दिवा मर्चंट सेवा संस्था या संघटनेची अध्यक्षा ज्योती पाटील, नम्रता राणे, रवी रसाळ, अरविंद कोठारी, चैन सिंग, राजू भाई, छगनसिंग अर्जुन गुजर, मोहित जैन, प्रकाश यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते. दिवा शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होऊन दुकाने बंद ठेवल्याबद्दल ज्योती पाटील यांनी सर्व दुकानदारांचे आभार मानले.




Post a Comment

Previous Post Next Post