अंबरनाथ \ अशोक नाईक : मैदानात...मैदान अंबरनाथ पूर्व भागातील प्रसिद्ध गावदेवी मैदान...हे अंबरनाथकरांना भूषणावह वाटेल अशा सुखसोयीयुक्त अद्यावत गावदेवी मैदानाचा नयनरम्य असा कायापालट झाला आहे. माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून अद्यावत गावदेवी मैदानात संगीत व प्रकाशमय जॉगिंग ट्रॅक,स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व्यायाम शाळा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यानातील खेळणी, ओपन जिम, योगा स्टेज इत्यादी वास्तूंचे लोकार्पण व राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यानातील राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवाजी राजे यांच्या प्रेरणादायी शिल्प अनावरण सोहळा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ३१ मार्च रोजी सायंकाळी ढोल ताशांच्या वाद्यांची सलामी देत, विविध ॲथलटिक्स स्पर्धेतील विजेतांना सन्मानित करत अतिशय थाटामाटात आणि मोठ्या उत्साही जल्लोषात पार पडला.
अद्यावत गावदेवी मैदानातील अनेक वास्तूंचे लोकार्पण आणि शिल्पांचे अनावरण सोहळ्याप्रसंगी विविध ॲथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मनुश्री आर्ट्स प्रस्तुत 'सोहळा संस्कृतीचा'या मनोरंजनात्मक नृत्य अविष्काराने रसिक प्रेक्षक भारावून गेले. या मनोरंजन कार्यक्रमात उपस्थितांसाठी प्रश्न मंजुषासह विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या लोकार्पण व अनावरण सोहळ्याचे संयोजक जॉगर्स क्लब ऑफ अंबरनाथ, संवाद फाउंडेशन, ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग ग्रुप, स्व. राजू मोरे प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान, छत्रपती शासन प्रतिष्ठान, आम्ही रायगडकर सेवाप्रतिष्ठान, शिवराज्य प्रतिष्ठान तसेच विविध क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांनी उत्तम नियोजन केले. या सोहळा प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे माजी नगरसेवक सुभाष साळुंके व संवाद फाउंडेशनच्या अध्यक्ष सुवर्णा साळुंके यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज फलके यांनी केले.
अंबरनाथमध्ये खेळ व खेळाडूंसाठी तसेच युवक, युवती,महिला,नागरिक व ज्येष्ठ नागरिक इत्यादींसाठी उपयुक्त असलेल्या गावदेवी मैदान व राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यान विकसित करण्याकरिता महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने नगर विकास विभागाच्या निधीतून गावदेवी मैदानाचा कायापालट केल्याचे माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी सांगितले.