अंबरनाथ \ अशोक नाईक : पुरातन कालीन शिवमंदिराच्या पावन पवित्र अंबरनाथ नगरीत हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत भारतीय संस्कृतीचे विराट दर्शन घडवत 'चला संस्कृती जतन आणि संवर्धनासाठी एक होऊया, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवूया, पाण्याचे उगम स्वच्छ ठेवूया, प्रदूषणाला आळा घालूया, स्वच्छ, सुंदर आणि निरोगी अंबरनाथ घडवूया, देशप्रेम जागवूया, पशुपक्षी प्राण्यांसह मानवी जीवनाचा मार्ग सुखमय करूया, अशा अनेक सामाजिक भावनेतून एकोप्याचा संकल्प ठेवत
शहरातील विविध भागातून आलेल्या उपयात्रांचा संगम छत्रपती शिवाजी महाराज चौकात घालून अंबरनाथकरांनी सामूहिक गुढी उभारून भव्य शोभायात्रीची सांगता हुतात्मा चौकात करत नववर्षाचे स्वागत आनंदमयी आणि जल्लोषात केले. दरम्यान यावर्षी देखील भारतीय नववर्ष स्वागत समितीची धुरा महिलांच्या हाती सोपविण्यात आली होती. समिती अध्यक्ष सरिता तुळशीराम चौधरी आणि समितीच्या वतीने सहभागी सर्वच शोभायात्रींचे आणि मंडळांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
शोभायात्रेत पूर्व भागातील वडवली विभागातून गावदेवी मंदिर येथून भव्य-दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत परिसरातील अनेक संस्था, संघटना, मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्वागतासाठी चौका-चौकात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शालेय विद्यार्थी,तरुण-तरुणी महिला , पुरुषाने पारंपारिक वेशभूषा करून नवीन वर्षाचे स्वागत केले. विविध विषयावर चित्ररथ, मर्दानी खेळ, तलवारबाजी, भाला चालवणे,लाठीकाठी, देवदेवतांचे वेशभूषेत चित्ररथ, बाईक रॅली, विविध नृत्यकलांसह अनेक शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. महिला, पुरुषांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून हातात भगवे ध्वज घेऊन मोठ्या उत्साहात शोभायात्रेत सहभाग झाले होते. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध विविध वेशभूषेत सजले होते.
महिलांनी नऊवारी साड्या परिधान केल्या होत्या.हातात तलवार घेऊन पारंपारिक लेझीम आणि मर्दानी खेळांमध्ये मोठा सहभाग घेतला होता. पुरुषाने धोतर, फेटे आणि पारंपारिक मराठमोळ्या वेषात शोभायात्रेची शान वाढवली. राजकीय पक्ष विरहित या शोभायात्रेत सर्वच पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि अंबरनाथकर मोठ्या संख्येने सहभागी होऊन हिंदू मराठी नवीन वर्षाचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले.