पाच भव्य ‘आय’ गर्डर्समुळे पनवेल–कर्जत उपनगरीय मार्गाच्या उभारणीस गती
पनवेल : पनवेल–कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या वेळेत पूर्णतेकडे वाटचाल करताना, मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. चौक स्थानकाजवळील किमी ८९/१ येथील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) ८९/१ साठी पाच भव्य "आय" प्रकारच्या गर्डर्सचे लाँचिंग करण्यात आले. या यशस्वी लाँचिंगमुळे पनवेल–कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या प्रगतीस अधिक वेग मिळणार असून, संपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रत्येक गर्डर हा ४८.३ मीटर लांब आणि २.५ मीटर खोल असून, त्याचे वजन सुमारे ८० मेट्रिक टन आहे. सर्व पाच गर्डर्सचे एकत्रित वजन ३७० ते ४०० मेट्रिक टनांदरम्यान असून, हा पनवेल–कर्जत विभागातील सर्वात मोठ्या स्पॅनपैकी एक मानला जातो. ही रचना पनवेल–कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गावर उभारली जात असून प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या गर्डर्सच्या लाँचिंगसाठी ७०० मेट्रिक टन क्षमतेच्या मुख्य क्रेनचा वापर करण्यात आला. सुरक्षेची पूर्तता आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी एक स्टँडबाय क्रेन, तीन हायड्रा (फरेंहा) क्रेन्स आणि एक पोकलेन मशीन देखील तैनात करण्यात आली होती. जवळपास ७० कामगारांसह एमआरव्हीसी, जनरल कन्सल्टंट (जीसी) व कंत्राटदारांचे अभियंते या प्रक्रियेदरम्यान उपस्थित होते. संभाव्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींसाठी एक वैद्यकीय व्हॅनही जागेवर सज्ज ठेवण्यात आली होती.