प्रशासनाने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर \ शेखर धोंगडे : अनधिकृत प्रवासी वाहतूक रोखण्याची मागणी करत जिल्हा बस वाहतूकदार संघटनेने प्रशासनाला ठोस कारवाईचा इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रवाशांसाठी नियमानुसार वाहतूक सुविधा देणे आवश्यक आहे, मात्र अनेक ठिकाणी अनधिकृत वाहने सर्रास धावत आहेत. त्यामुळे अधिकृत बस वाहतूकदारांना तोटा सहन करावा लागत असून प्रवासी देखील असुरक्षित प्रवास करत आहेत.
संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले की, "कायद्याचे पालन करीत अधिकृत बस वाहतूक करणाऱ्या चालकांना वारंवार तोटा सहन करावा लागत आहे. प्रशासनाने चेकपोस्टवर कडक तपासणी करावी व नियमबाह्य वाहतुकीवर बंदी घालावी. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल." प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही अनधिकृत वाहतूक सुरूच आहे. डिझेल दरवाढ, पोलिसांकडून होणारा अन्याय, तसेच विनापरवाना वाहतुकीमुळे अधिकृत बस मालक अडचणीत आले आहेत. यावर त्वरित तोडगा न काढल्यास संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ही निवेदनातून संजय भोर यांना देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेने जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. यामध्ये चेकपोस्टवर सतत निरीक्षण, अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर दंड आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने कारवाई करावी यासह अनेक मागण्या प्रादेशिक अधिकारी संजय भोर यांच्याकडे मांडण्यात आल्या.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, तसेच प्रमुख पदाधिकारी रमेश पाटील, उमेश पवार, आनंद कांबळे, दिनकर गायकवाड, संजय माळी, सचिन पाटील, सुभाष जाधव, रवींद्र पाटील, गिरीश कुलकर्णी, अमर कांबळे, विजय माने, निलेश पाटील, अशोक कुचकोरवी, सतीश नाईक, राहुल जाधव, मयूर शिंदे, सचिन पवार, सुरेश भोसले आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील काही दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास, संघटनात्मक पातळीवर व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा बस वाहतूकदार संघटनेने प्रादेशिक अधिकारी संजय भोर यांना दिला.


