डोंबिवलीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो पुरुष-महिला पैलवान दाखल
डोंबिवली \ शंकर जाधव : डोंविवली मोठगाव ठाकुर्ली, येथे गावदेवी मंदिर संस्थान व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोटू आई पालखी महोत्सव व जत्रा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीही हा सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या यात्रेनिमित्त मोठगाव ठाकुर्ली येथील महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक शाळेच्या परिसरात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे कुस्ती स्पर्धा, ज्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीगीरांनी भाग घेतला. अशा प्रकारे शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा पुढे चालू ठेवली. या वर्षी महिला कुस्तीगीरांचा उत्स्फूर्त सहभाग हा एक विशेष आकर्षण होता, त्यांच्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी, रोख पारितोषिके आणि लाखो रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी महापौर पुडलिंक म्हात्रे, शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, संतोष केणे, एकनाथ म्हात्रे यांच्यासह अनेक अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या सामन्यात ठाणे जिल्ह्यातील शेकडो कुस्तीगीर सहभागी झाले होते.ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले की, ग्रामीण भागातील मातीचा हा खेळ शहरी भागातही खेळला जात आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. सरकारने कुस्तीपटूंबद्दलही अधिक विचार करण्याची गरज आहे. कुस्ती हा मातीचा खेळ आहे. डोंबिवलीमध्ये दरवर्षी कुस्ती स्पर्धा होतात, जर असे सामने प्रत्येक शहरात झाले तर खेळाडूंचे मनोबल वाढेल.