अंबरनाथ/ अशोक नाईक : १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई बोरीबंदर ते ठाणे दरम्यान आशियातील पहिली ट्रेन धावली. कल्याण ते पळसधरी रेल्वेची स्थापना ब्रिटिश काळात १८५४ मध्ये झाली. भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासाचा १७२ वा वाढदिवस साजरा होत असताना, याच रेल्वे मार्गावरील तत्कालीन 'हाल्याचा पाडा'आणि आताचे नाव अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील सह्याद्री पर्वत रांगेतील श्री मलंगगडाच्या 'तावली'डोंगराच्या कुशीतून एकेकाळी झुळझुळ वाहणारी वालधुनी नदी बोहनोली गावातून 'काकोळे' येथे मोठ्या जलसाठ्यात रूपांतरी झाली. त्यावर तत्कालीन काळात ब्रिटिशांनी रेल्वेसाठी लागणाऱ्या पाण्याकरिता (कल्याण लोको शेड) जीआयपी धरण बांधले होते. आजही त्या वालधुनी नदीचा विसर पडू शकत नाही. असा पुन्हा योगायोग आज १६ एप्रिल रोजी भारतीय रेल्वेच्या १७२ व्या वर्धापन दिनी या काकोळे धरणावर...अखेर द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे डॅम असा बोर्ड झळकला ! त्यामुळे १७२ वर्षानंतर वालधुनी नदी आणि काकोळे धरणाचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे.
कल्याण ते पळसदरी रेल्वे मार्गाला भक्कमपणे सह्याद्री पर्वत रांगेची निसर्ग रम्य अशी साथ आहे. श्रीमलंगडाच्या तावली डोंगरातून वालधुनी नदीचा उगम झाला. बोहनोली गावातून ते काकोळे गाव येथील सखल भागात जलसाठा करून कल्याण लोको शेडला लागणारे पाणी पुरवण्यासाठी ब्रिटिशांनी 'जीआयपी टॅंक' म्हणजे धरण बांधले होते. कालांतराने हा पाणीपुरवठा बंद झाला.आज रेल्वेच्या जीआयपी टॅंक प्रकल्पावर रेल 'नीर'नावाचा बाटलीबंद पाणी प्रकल्प सुरू आहे.
सुमारे रोज दहा लाख बाटली बंद पाण्याच्या पाण्याच्या क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथील बाटली बंद रेल 'निर पाणी विविध रेल्वे स्थानकात वितरित केले जाते. आजही या धरणातील पाण्याचे 'नितळ' असं गमक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील शेकडो शेतकरी कुटुंब कुठलीही प्रक्रिया न करता त्या काळापासून आजही नळ पाणी फिल्टर योजना येईपर्यंत याच काकोळे धरणातील पाण्याचा वापर करत असतात. उर्वरित वाहणाऱ्या पाण्यावर शेती, फळभाज्यांचे उत्पादन घेतलं जातं. सध्या या धरणावर रेल्वेचा 'रेल निर' बाटलीबंद पाण्याचा प्रकल्प सुरू आहे. मात्र गेला १७२ वर्षानंतर अखेर वालधुनी नदीच्या उगम स्थानावरील काकोळ धरणावर 'द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे धरण' असा बोर्ड लावून भारतीय रेल्वेचा १७२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.