आदिवासी पाड्यांत दिवाळीचा प्रकाश

 


  भूमिपुत्र प्रतिष्ठान, माटुंगातर्फे अनोखी दिवाळी साजरी

दिवा \ आरती परब :  सामाजिक बांधिलकी जपत भूमिपुत्र प्रतिष्ठान, माटुंगा तर्फे यंदा दिवाळीचा उत्सव अनोख्या आणि हृदयस्पर्शी पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी भूतिवली वाडी, सागाची वाडी, चिंचवाडी, आसलवाडी आणि भडवल वाडी या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तेथील माता- भगिनी व बालकांसोबत दिवाळी साजरी केली. या माध्यमातून समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा संदेश पोहोचवण्यात आला.


या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना “श्री गणेश प्रिय बौद्धिक उपक्रमात” जमा झालेल्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच माता- भगिनींना साड्या व पारंपरिक दिवाळी फराळ देऊन सणाचा आनंद अधिक खुलवण्यात आला.


या कार्यक्रमाद्वारे “नात्यांचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचावा” हा संदेश देण्यात आला. स्थानिक नागरिकांनी आणि लाभार्थ्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करून भूमिपुत्र प्रतिष्ठानचे आभार मानले.


प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे आनंदाचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे. या उपक्रमाद्वारे आम्ही नव्या नात्यांसोबत दिवाळी साजरी करून समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला.”


सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या भूमिपुत्र प्रतिष्ठानने यापूर्वी शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. आजच्या कार्यक्रमात आदिवासी वाड्यांतील शिक्षक आनंद कराळे, प्रशांत कराळे, गणेश रूठे, योगेश शेळके यांच्या सहकार्याबद्दल प्रतिष्ठानने त्यांचे आभार मानले. तसेच राजकुमार कराळे, मंगेश शेळके, विलास लोभी, हर्षद दिसले, नथुराम शेळके, हिराजी, शैलेश आणि अन्य ग्रामस्थांनी नाश्ता व जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post