३१ ऑक्टोबरला ZEE5 वर होणार प्रीमिअर
डोंबिवली : दिवाळी पहाटेच्या सांस्कृतिक उत्सवात डोंबिवलीकरांसाठी खास भेट म्हणून ZEE5 या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बाई तुझ्यापायी’ या मराठी ओरिजिनल मालिकेचा ट्रेलर सादर करण्यात आला. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी-फोर प्रॉडक्शन निर्मित ही मालिका ३१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
फडके रोडवरील दिवाळी पहाट कार्यक्रमात झालेल्या या ट्रेलर लाँचला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मालिकेतील मुख्य कलाकार साजिरी जोशी (अहिल्या) आणि क्षिती जोग (अहिल्याची आई लक्ष्मी) यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत आली. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ‘बाई तुझ्यापायी’ या मालिकेवर आधारित नुक्कड नाटक ज्यातून एका मुलीचा अंधश्रद्धेविरुद्धचा आणि शिक्षणासाठीचा संघर्ष जिवंत झाला.
#MePanAhilya या मोहिमेअंतर्गत अनेक मुलींनी अहिल्याच्या वेशात येऊन स्त्रीशक्तीचा सामूहिक उत्सव साजरा केला. या प्रसंगी मालिकेचा ट्रेलर मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित होताच, प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि ‘अहिल्या झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला. या मालिकेत एका गावातील अंधश्रद्धेच्या बेड्या तोडून शिक्षणासाठी उभ्या राहणाऱ्या मुलीची प्रेरणादायी कहाणी सादर केली आहे. ‘बाई तुझ्यापायी’ ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट नसून बदलाच्या दिशेने पेटून उठलेल्या प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे.
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाले, “‘बाई तुझ्यापायी’ ही फक्त एका मुलीची कथा नाही, तर सत्य आणि रुढी यांच्यातील संघर्षाचं दर्शन घडवणारी गोष्ट आहे. अहिल्याच्या प्रवासातून समाजातल्या बदलाची चाहूल लागते.”
तर क्षिती जोग यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले, “लक्ष्मी श्रद्धा आणि प्रेमाच्या सीमारेषेवर उभी असलेली आई आहे. तिच्या मुलीच्या हितासाठी ती अंतर्गत संघर्ष करते. ही गोष्ट अनेक मातांना आपली वाटेल.”
मुख्य भूमिका साकारणारी साजिरी जोशी म्हणाली, “अहिल्याची गोष्ट ही आशेची गोष्ट आहे. शिक्षणामुळे आयुष्य कसं बदलू शकतं, हे मी पुन्हा अनुभवले. हा शो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.” ही मालिका निखिल खैरे आणि मुक्ता बाम यांनी लिहिली असून सिद्धेश धुरी आणि शिवराज वायचळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार अभिनय, वास्तवाशी नाळ जोडलेलं कथानक आणि सामाजिक संदेश यामुळे ‘बाई तुझ्यापायी’ ही मालिका प्रेक्षकांना अंतर्मुख करेल, असा विश्वास ZEE5 च्या टीमने व्यक्त केला.