नवी मुंबई : सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीच्या अनुषंगाने बाजारात प्लास्टिकचा वापर वाढतो हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खबरदारी घेत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर आधीपासूनच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले.
या अनुषंगाने महानगरपालिकेची भरारी पथके कार्यान्वित झाली असून मागील आठवड्यात परिमंडळ १ च्या पथकाने ३०० किलो प्रतिबंधात्मक साठा जप्त केला होता. त्याचप्रमाणे परिमंडळ २ मधील प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकाने उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली काम करताना दि. २७ मार्च रोजी दुचाकीवरून प्लास्टिक पिशव्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची खबर मिळाल्यावरून ऐरोली टोलनाका येथे पथकाने सापळा लावून दुचाकीवरून वाहतूक होणारा १०० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा ताब्यात घेतला. तसेच वाहनही जप्त करण्यात आले.
याचप्रमाणे दि. २८ मार्च रोजी महापेगाव येथेही इलेक्ट्रिकल दुचाकी वाहनावरून नेला जात असलेला ४० किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला व गाडी ताब्यात घेतली याशिवाय पथकाने दि. २६ मार्च रोजी दिघा येथील रामदेव स्विट्स मध्ये एकल वापर प्लास्टिक पिशव्या आढळल्याने ५ हजार दंडात्मक रक्कम वसूली केली. तसेच न्यू प्रेम स्विट्स घणसोली यांचेकडेही प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्याने ५ हाजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. २८ मार्च रोजी रोजी सेक्टर १९ ऐरोली येथील अजय फ्रुटवाले यांच्याकडून ५ हजार दंडात्मक वसूली आणि १ किलो एकल वापरातील प्लास्टिकसह प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. २९ मार्च रोजीही सेक्टर १९ ऐरोली येथेच बिस्मिला कॅटरींग यांचेकडून ५ हजार दंडात्मक रक्कम आणि ५ किलो १०० ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
३१ मार्च रोजी घणसोली शिवाजी तलाव येथे विनोद चौधरी यांचेकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्याने त्यांचेकडून १०० ग्रॅम पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच सेक्टर ७ वाशी येथेही २ किलो प्लास्टिक पिशव्यांची जप्ती तसेच ५ हजार दंड वसूली करण्यात आली. १ एप्रिल रोजीही ऐरोली टोलनाका येथे टिव्हीएस स्कुटीवरून प्लास्टिक पिशव्यांची वाहतुक करताना आढळल्याने ५ हजार दंडात्मक वसूली करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरापालिकेची विभागातील पथके तसेच परिमंडळनिहाय भरारी पथके सातत्याने तपासणी करून प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी प्रयत्न करीत असून प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर आढळल्यास दंडात्मक कारवाईही करीत आहेत. यापाठीमागील उद्देश हा दंडात्मक रक्कम आकारणी करणे हा नसून पर्यावरणाला व मानवी जीवनाला हानीकारक असणा-या प्लास्टिकचा वापर थांबविणे हा आहे. तरी नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कापडी पिशव्यांचा पर्यावरणशील पर्याय स्विकारावा व सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.



