पाणीटंचाईत टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा जलवाहिन्या तात्काळ जोडा


मनसेच्या साबे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांची मागणी


दिवा \ आरती परब :  दिव्यात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या पाणी माफियांवर कारवाईचे दिवा मनसेने स्वागत केले असून त्याबद्दल आभार मानले आहेत. पण या कारवाईला एवढा उशीर का असा प्रश्न ही पाणी दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना विचारला. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने एकूण ७४ नळ जोडणी व टॅंकर भरणा केंद्रावर केलेल्या कारवाईमुळे पाणी चोरांचे धाबे दणाणले असून सदरच्या कारवाई नंतर तात्काळ दिवा शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या उपशाखा पाइपलाईनची जोडणी करून ती तात्काळ सुरु करण्याची मागणी दिवा मनसेने केली आहे.
तर दिवा शहरातील काही भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून अनेक भागात पाणीपुरवठा कमी दाबाने सुरु असल्याने दिवेकरांचे प्रचंड हाल होत आहे. विकतचेही पाणी आता उपलब्ध होत नसल्याने दिवेकर मेटकुटीला आहे. 


उपशाखा वाहिन्यांना पाणीच येत नसल्याचे धक्कादायक वास्तव स्थानिकांकडून उघड करण्यात आले आहे. काही परिसरात पाणी येत नाही तर काही ठिकाणी दोन- तीन दिवसांनी पाणी येते. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. परिणामी दिव्यातील साबे गावातील मनसे विभाग प्रमुखाने आक्रमक होत ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ दिव्यातील टंचाई ग्रस्त भागात मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करावा व उप जलवाहिन्या तात्काळ जोडणी करून सुरु करण्याची मागणी केली आहे.


तसेच दिव्यातील पाणी प्रश्नावर स्वतः सहाय्यक आयुक्तांनी लक्ष घालण्यासाठी मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त राजेंद्र गिरी यांना निवेदनाद्वारे मागणीची विनंती केली आहे. सदर मागणी तात्काळ पूर्ण न केल्यास दिवा मनसे आंदोलन करेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिकेने दिव्यामध्ये सर्वत्र पुरेसा पाणीपुरवठा करावा तसेच आवश्यक तिथे टँकरची उपलब्धता करून येथील नागरिकांचे पाणी संकट दूर करण्याची मागणी दिवा मनसेने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post