कोल्हापूर \ शेखर धोंगडे : शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे व राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), जिल्हा कोल्हापूरच्या वतीने स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये डोळ्यावर काळी पट्टी बांधून सलग ३६ किलोमीटर स्केटिंग करून विश्वविक्रम करणारी इशिका चेतन डावरे (पुणे), इटली येथे झालेल्या जागतिक स्केटिंग स्पर्धेत भारतीय संघासाठी कास्यपदक मिळवून देणारी तेजस्विनी रामचंद्र कदम, तसेच सात वर्षांपासून सलग राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकवणारी ॲड. धनश्री रामचंद्र कदम यांचा समावेश होता.
या सोहळ्यात विविध खेळांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या, आणि स्केटिंग प्रशिक्षक म्हणून विशेष योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम यांना "उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक" हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा), प्रदेशाध्यक्ष (मातंग समाज) अण्णा वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. आरती डावरे (पुणे), उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कैलाश कांबळे, मातंग आघाडी उपाध्यक्ष पै. संतोष काची, पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जोगदंड, पिंपरी चिंचवड अध्यक्ष धीरज सकट, पिंपरी चिंचवड अध्यक्षा सौ. पुनम जाधव, व कल्याण तालुका अध्यक्षा कु. विमल चव्हाण यांनी केले.