ठाणे : शिवाईनगर भागातील विविध सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाढीव पाणीपट्टीच्या स्वरूपात आलेल्या नोटीसला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून, या बिलांवरील दंड पूर्णतः माफ करण्यात आला आहे. हा निर्णय नागरिकांना दिलासा देणारा असून, गेल्या काही महिन्यांपासून उद्भवलेल्या आर्थिक आणि मानसिक तणावातून काहीसा मुक्तीचा श्वास मिळाला आहे..
या संदर्भात ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन शिवाईनगर परिसरातील नागरिकांची कैफियत मांडली होती. या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, गेल्या २०-२२ वर्षांपासून काही ठराविक सोसायट्यांना पाणीपट्टीचे कोणतेही नियमित बिल आले नव्हते. मात्र, अलीकडेच म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांनी अचानक दंडात्मक रक्कमेसह थकीत बिलांची नोटीस पाठवून नागरिकांना वेठीस धरले. यामध्ये गिरीराज, गीतांजली, शिवशक्ती, चिन्मय, प्रगती, ओम साई श्रद्धा, श्री समर्थ, सहजीवन, सुनीती, एकरूप, नवदुर्गा आणि गुरुकृपा अशा प्रमुख सोसायट्यांचा समावेश आहे.
या पाश्र्वभूमीवर परिषा सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ठाण्यातील नगरसेवकांसह म्हाडाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनाच्या अनुषंगाने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी संबंधित नोटिशीवर त्वरित कार्यवाही करत तात्पुरती स्थगिती दिली. तसेच, ज्या नागरिकांकडे केवळ पाणी जोडणी असून प्रत्यक्षात पाणीपुरवठा होत नाही, अशा रहिवाशांचे बिल पूर्णतः माफ करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय, काही सोसायट्यांना मुंबई महापालिका तर काहींना ठाणे महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो का, याची सखोल चौकशी करून याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दंड रक्कम पूर्णतः माफ करण्यासोबतच, मूळ बिलाच्या टप्प्याटप्प्याने भरण्यास सवलत देण्यात येईल, अशी माहितीही जयस्वाल यांनी दिली. यासंदर्भात महापालिका आणि म्हाडा यांच्यात समन्वय साधून भविष्यात नागरिकांना अशा अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाची भावना असून, माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी म्हाडा प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच भविष्यात जर असा अन्याय पुन्हा झाला, तर आपला संघर्ष सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस माजी नगरसेविका विमल भोईर, शिवसैनिक संजय कदम, तसेच शिवाईनगर परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.