हतनूर धरणावर ३१० प्रजातींच्या पक्ष्यांचा सहवास

 


जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा दौरा; पर्यावरणीय पर्यटनाला नवे बळ

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण परिसरातील जैवविविधता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हतनूर धरणाच्या जलाशयास भेट देत परिसरातील निसर्गसंपत्तीचा आढावा घेतला. त्यांनी स्वतः ३१० हून अधिक पक्षी प्रजातींच्या अधिवासाचे निरीक्षण केले आणि संवर्धन, पर्यावरणीय पर्यटन व स्थानिक विकास यांचा समन्वय साधणाऱ्या योजनांचा प्रारंभ केला.

पश्चिम भारतात जैवविविधतेच्या दृष्टीने हतनूर हे एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. धरणाचा जलाशय, आसपासची दलदलीची जमीन, वाळवंटसदृश मोकळ्या जागा आणि झाडांच्या पट्ट्यांमुळे येथे विविध प्रकारच्या पक्ष्यांना योग्य अधिवास मिळतो. या ठिकाणी पाणपक्षी, गवताळ भागातील पक्षी, शिकारी पक्षी आणि अनेक स्थलांतरित पक्षी दरवर्षी हजारोंच्या संख्येने येत असतात. या पक्ष्यांमध्ये काही अत्यंत दुर्मीळ आणि संरक्षित प्रजातींचाही समावेश आहे.

या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी प्रसाद यांनी वन विभाग, सिंचन विभाग, स्थानिक पर्यावरणप्रेमी संघटना, पक्षी निरीक्षक, आणि संवर्धन कार्यकर्त्यांची बैठक घेऊन हतनूर परिसराला "Birding and Nature Tourism Hub" म्हणून विकसित करण्याच्या योजनांचा आढावा घेतला. यामध्ये पर्यावरणीय पर्यटनाला चालना देणे, स्थानिक युवकांसाठी रोजगार संधी निर्माण करणे, पक्षी संवर्धनासाठी संस्थात्मक पाठबळ देणे आणि जागतिक पर्यावरण महत्त्व सांगणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे.

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पर्यावरण आणि विकास हे एकमेकांचे पर्याय नाहीत, तर ते एकत्र चालू शकतात. आपण हतनूरच्या संवर्धनाद्वारे हे दाखवून देणार आहोत.” या परिसरात गेल्या काही वर्षांत पक्षी निरीक्षणासाठी राज्यातील तसेच देशातील अनेक पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार येत आहेत. या पार्श्वभूमीवर, वन सफारीच्या धर्तीवर स्थानिक गाईड्स, पाहुण्यांसाठी सुविधा, निरीक्षण मनोरे, माहिती केंद्रे आणि जैवविविधतेवर आधारित अभ्यास व कार्यशाळा यांची आखणी करण्यात येणार आहे.


गेल्या दोन वर्षांत जळगाव जिल्ह्यातील पाल वन सफारी हा उपक्रम यशस्वी ठरला असून, स्थानिक पर्यटनाला चालना देत अनेकांना रोजगारही निर्माण झाला. आता हतनूर परिसरासाठीही अशी योजना राबवली जाणार आहे. धरण परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, युवक मंडळे, शिक्षणसंस्था, आणि पर्यावरण प्रेमींना या उपक्रमात सहभागी करून, सर्वसमावेशक विकास व संवर्धन साधण्यावर भर दिला जाणार आहे.

हतनूर जलाशयातील पक्षी प्रजातींचा वैभव

  • ग्रे हेरॉन, फ्लेमिंगो, पेंटेड स्टॉर्क,
  • ब्लॅक विंग्ड स्टिल्ट, युरेशियन वॅगटेल,
  • शिकरा, पाणकोंबडा, ब्राम्हणी बदकं
    या आणि इतर अनेक स्थलांतरित व स्थानिक प्रजातींचा समावेश आहे. 


 

Post a Comment

Previous Post Next Post