२०११ पासून बंद असलेल्या नागरी सुविधा पुन्हा सुरू होणार
नवी मुंबई : नवी मुंबई हे राज्यातील सर्वाधिक नियोजनबद्ध शहर मानले जात असले तरी अनेक कंडोमिनियम वस्त्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरी सुविधा न मिळाल्यामुळे नागरिक त्रस्त होते. सिडकोच्या मालकीच्या जमिनींवर उभारलेल्या या वस्त्यांमध्ये २०११ पासून महानगरपालिकेकडून कोणतीही नागरी कामे करण्यात आलेली नव्हती. परिणामी, पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा, रस्ते आणि रस्त्यावरील विद्युत व्यवस्था या मूलभूत सुविधांचा अभाव होता.
या गंभीर समस्येकडे खासदार नरेश म्हस्के यांनी लक्ष वेधून घेतल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सह्याद्री अतिथिगृह येथे एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी भूषवले. नगरविकास विभागाचे मुख्य सचिव असीम गुप्ता, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे संचालक गणेश देशमुख, दयानिधी राजा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत खासदारांनी नवी मुंबईतील नागरिकांच्या समस्या सविस्तरपणे मांडल्या. विशेषतः कंडोमिनियम अंतर्गत येणाऱ्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरजू नागरिकांची स्थिती, सुविधांअभावी निर्माण झालेली जीवनशैलीतील अडचण यावर प्रकाश टाकला.
नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ७०% लोकसंख्या या वस्त्यांमध्ये राहत असून सिडकोने घरे वितरित केल्यानंतर महापालिकेने नागरी सेवा पुरवणे बंद केले होते. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
बैठकीदरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की, महापालिका आता या वस्त्यांमध्ये नागरी सुविधा पुन्हा सुरू करेल. मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी तत्काळ ड्रेनेज व पाणीपुरवठा यासारखी कामे सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच, रस्त्यावरील लाईट, रस्त्यांचे डांबरीकरण आणि इतर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी लवकरच शासन महापालिकेला अधिकृत मान्यता देणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या निर्णयामुळे नवी मुंबईतील कंडोमिनियम भागात राहणाऱ्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या नागरी सुविधा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त केले जात आहे.



