सहा जण जखमी, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण पूर्वेतील चार मजली सप्तशृंगी इमारतीतील स्लॅबचा काही भाग मंगळवारी कोसळून किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी कल्याण पूर्वेतील कर्पेवाडी परिसरातील घडली.
सदर घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन विभागाचे बचाव पथक आणि पोलीस प्रशासन बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. याबाबत अग्निशमन जवानांकडून मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या आतील बाजूचा काही भाग दुसऱ्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंत कोसळला असून त्यामध्ये काही लोक अडकली आहेत. बचाव कार्य करतांना पथकाला चार जणांना बाहेर बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अग्निशमन विभागाचे जवान अजूनही कोणी आत अडकले आहे का याचा तपास करीत आहेत. या घटनेबाबत पालिकेतील मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत होती आणि ती पावसाळ्यापूर्वी रिकामी करण्याची नोटीसही बजावण्यात आली होती. तसेच पावसाळ्यापूर्वी रिकामी करण्याची सूचनाही देण्यात आली होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास श्री सप्तशृंगी को. ऑपरेटिंग हाउसिंग सोसायटी, शिवसेना ऑफिसच्या मागे, चिकणीपाडा तिसगाव रोड, कल्याण पूर्व या ठिकाणी बिल्डिंगचा स्लॅप कोसळल्याची माहिती मिळाली. सदर सोसायटीच्या चौथ्या माळ्यावरील स्लॅप खाली तळमजऱ्यापर्यंत पडल्याने सदर सोसायटीतील एकूण ६ जखमी व ६ मयत झालेले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
कल्याणमधील धक्कादायक इमारत दुर्घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत इमारतीचे छत कोसळून सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच या अपघातग्रस्त कुटुंबीयांच्या दुःखात शासन आणि जनतेसोबत आपणही सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. हे आर्थिक सहाय्य शासनाच्या आपत्कालीन निधीतून तातडीने वितरित केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर जखमींच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत तत्काळ पुरविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.ही दुर्घटना अतिशय वेदनादायक असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी बांधकामांची तपासणी करणे आणि जीर्ण इमारतींबाबत तातडीची कार्यवाही करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी स्थानिक प्रशासनाला योग्य ती मदत करण्याचे निर्देश दिले असून, अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.
मृत व्यक्तींची यादी
अ.क्र. १: सुशिला नारायण गुजर (महिला, ७८ वर्षे) - चैतन्य हॉस्पिटल
अ.क्र. २: नामस्वी श्रीकांत शेलार (महिला, १.५ वर्षे) - आशिर्वाद हॉस्पिटल
अ.क्र. ३: व्यंकट चव्हाण (पुरुष, ३२ वर्षे) - घटनास्थळी
अ.क्र. ४: सुनिता निरंजन साहू (महिला, ३८ वर्षे) - चैतन्य हॉस्पिटल
अ.क्र. ५: प्रमिला कालीचरण साहू (महिला, ५६ वर्षे) - चैतन्य हॉस्पिटल
अ.क्र. ६: सुजाता मनोज पाडी (महिला, ३२ वर्षे) - घटनास्थळी
जखमी व्यक्तींची यादी
अ.क्र. १: अरुणा रोहिदास गिरनारायण (महिला, ४८ वर्षे) - अमेय हॉस्पिटल
अ.क्र. २: यश जितेंद्र क्षीरसागर (मुलगा, १३ वर्षे) - चैतन्य हॉस्पिटल
अ.क्र. ३: निखिल खरात (पुरुष, २६ वर्षे) - चैतन्य हॉस्पिटल
अ.क्र. ४: विनायक मनोज पार्धी (मुलगा, ४.५ वर्षे) - आशिर्वाद हॉस्पिटल
अ.क्र.५: श्रावील श्रीकांत शेलार (मुलगा, ४.३ वर्षे) - आशिर्वाद हॉस्पिटल
अ.क्र. ६: श्रद्धा साहू (महिला, १४ वर्षे) - बाई रुक्मिणी हॉस्पिटल