जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

 


भात शेतीसह आंब्याचे शेतकरी चिंतेत

रायगड \ धनंजय कवठेकर : जिल्ह्यात पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.अद्याप पावसाची रिप रिप सुरुच आहे. या पावसामुळे उन्हाळी भात शेतीसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू असल्याने शेतात पिकून आलेला भात शेतकऱ्यांना घरात आणणं कठीण झालं आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाईल, या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे. 

मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. आठ दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. 


केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरले असून रविवारी तिन्ही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात आज पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. नालेसफाईची कामे अद्यापही रेंगाळल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे अलिबाग, मुरुड, राेहा, पेण, कर्जत, माणगाव, म्हसळा, महाड, श्रीवर्धन, पाेलादपूरसह अन्य तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post