गेल्या २० वर्षांपासून रस्त्यावर खड्डेच खड्डे; डांबरीकरणाकडे दुर्लक्ष
राजकीय नेते बॅनरबाजी,जाहिरातबाजी व कार्यक्रमात व्यस्त
धनंजय कवठेकर \ अलिबाग : शितलादेवी मंदिर आणि मुरुडच्या दिशेने जाणाऱ्या चौल नाका रस्त्याची दयनीय अवस्था नागरिकांचे आरोग्य आणि संयम दोन्ही कसोटीला लावत आहे. गेली २० वर्षे या रस्त्यावर खड्डेच खड्डे असून, आजतागायत या मार्गाचे डांबरीकरण झालेले नाही. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे टाळताना वाहनचालकांचे पाठदुखीपासून अपघातापर्यंतचे हाल होत आहेत.
रोजच्या वापरात असलेला हा रस्ता परिसरातील माळनी भागातील ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकरी आणि महिलावर्ग येथे भाज्या विकायला बसतात. मात्र त्यांच्यासाठी नीट बसण्याची व्यवस्था नाही. खड्ड्यांमुळे रस्त्यावर उभी राहणेही धोकादायक ठरत आहे. यामुळे अनेक महिला कंबरदुखी, पाठदुखी यांसारख्या समस्यांनी त्रस्त झाल्या आहेत.
स्थानिक पातळीवरील अनेक राजकीय नेते बॅनरबाजी, जाहिरातबाजी आणि कार्यक्रमात रमलेले दिसतात. मात्र चौल नाका रस्त्याच्या दुरवस्थेकडे कोणाचेही लक्ष जात नाही. ग्रामस्थांनी अनेक वेळा पंचायत समितीकडे तक्रारी केल्या असूनही कामाची कोणतीच ठोस पावले उचलली जात नाहीत.
नजीकच असलेले शितलादेवी मंदिर हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असून येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. परंतु रस्त्याच्या स्थितीमुळे दर्शनासाठी येणाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतो.रस्ता डागडुजी करून वेळ मारून नेली जाते, पण कायमस्वरूपी डांबरीकरणाचे कोणाचेच लक्ष नाही," अशी तीव्र नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली. हा रस्ता तातडीने डांबरीकरण करून जनतेसाठी सुलभ व सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.