२३ माध्यमिक शाळांचा निकाल ९४.७२ टक्के
अंशिका यादव ९५ टक्के गुण संपादन करुन सर्वप्रथम
नवी मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळांचा निकाल ९४.७२ टक्के एवढा लागलेला आहे.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १०४ राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, रबाळे येथील अंशिका अंगद यादव ही विद्यार्थिनी ९५ टक्के गुण संपादन करुन महानगरपालिकेच्या २३ माध्यमिक शाळांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तिचे व सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधून विद्यार्थ्यांनी दहावीची शालांत परीक्षा दिली. या परीक्षेत नमुंमपा माध्यमिक २३ शाळांतील २६९८ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी २५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महानगरपालिका शाळांचा एकूण निकाल ९४.७२ टक्के एवढा लागलेला आहे.
विशेष म्हणजे नमुंमपा संचलित २३ माध्यमिक शाळांमधून नमुंमपा शाळा क्रमांक १०८ दिघा, नमुंमपा शाळा क्र.१११ तुर्भ स्टोअर, नमुंमपा शाळा क्र. ११६ सानपाडा या ३ महानगरपालिका माध्यमिक शाळांचा १००% निकाल लागलेला आहे.
या २३ शाळांमधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा क्रमांक १०४, आंबेडकर नगर, रबाळे येथील अंशिका अंगद यादव या विद्यार्थिनीने ९५ टक्के गुण संपादन करीत महानगरपालिका शाळांमध्ये सर्वप्रथम क्रमांकाचे सर्वोत्तम गुण संपादन केले. नमुंमपा शाळा क्रमांक ११८ पावणे येथील साहिल युवराज जाधव हा विद्यार्थी ९४.६० टक्के गुण संपादन करुन व्दितीय क्रमांकाचा आणि नमुंमपा शाळा क्रमांक १२१, कुकशेत येथील विद्यार्थिनी रुक्कया गुफरान अन्सारी हिने ९४ टक्के गुण संपादन करीत तृतीय क्रमांकाचा बहुमान पटकाविला.
नमुंमपा शाळेतील विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारेआणि शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी उज्जवल यश संपादन करणा-या यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचेही अभिनंदन करीत भविष्यातील अधिक चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सर्व महानगरपालिका माध्यमिक शाळांना २१ मार्गदर्शक अपेक्षित संच पुरविण्यात आले होते. तसेच दिवाळीच्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यानंतर दररोज एक तास विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेला सराव प्रश्नसंच उपलब्ध करुन देऊन प्रश्नसंचाचा उपयोग करुन शाळा स्तरावर सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शालेय स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांनी मेहनत घेतल्याची फलश्रूती म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश असून याबद्दल विद्यार्थ्यांसह त्यांच्या शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.