माणगाव \ धनंजय कवठेकर :पुण्यातून कोकणात जाणाऱ्या व कोकणातून पुढे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी असतानाच माणगाव ते पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात ॲसिडने भरलेला टँकर उलटल्याने खळबळ उडाली आहे. हा मार्ग तातडीने सुरक्षेच्या उपायोजना म्हणून वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्यात आला. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. हा मार्ग सुरू होण्यासाठी अजून तीन ते चार तासांनी पुन्हा वाहतुकीस खुला करण्यात आला. घटनास्थळी पुणे जिल्ह्यातील व रायगड जिल्ह्यातील पोलीस व सुरक्षा यंत्रणा दाखल झाली होती.
ताम्हिणी घाटात डोंगरवाडी गावाजवळ रविवारी सकाळी हायड्रोक्लोरिक ॲसिड नेणारा टँकर रस्त्याच्याकडेला पलटी झाला. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲसिड गळती झाली आणि धूर देखील निघत होता. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी व पोलिस पोहचले. त्यांनी खबरदारी घेऊन त्या ठिकाणी नियोजन केले.
त्यानंतर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम त्या ठिकाणी पोहोचली व ॲसिड गळती रोखणे, आजूबाजूचा परिसर सुरक्षित करणे आदी कार्यवाही सुरु झाली. त्यानंतर टँकर बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, रविवारची सुट्टी असल्याने सुट्टी संपून कोकणाकडून पुण्यात जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी झाली होती. तर या वेळेला सुट्ट्यांच्या शेवटच्या टप्प्यात पुण्यातून कोकणात दाखल होणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी होती.
कोकणात रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून पुण्याकडे जाणारा हा सगळ्यात जवळचा मार्ग आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, मंडणगड, गुहागर चिपळूण तालुक्यातील अनेक प्रवासी वाहने या मार्गाचा उपयोग करतात. टँकर पलटी झाला ते डोंगरवाडी परिसरातील घाटातील ठिकाण पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आहे. पुणे पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलिसही घटनास्थळी उपस्थित होते.