*सभासद नोंदणीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर एक करा*
*मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन*
*स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राष्ट्रवादी राज्यात एक नंबर असेल*
कागल \ विनायक जितकर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर एक करा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कागलमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या सभासद नोंदणी मोहिमेच्या आढावा मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर होते. भाषणात पुढे बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, हा मेळावा व सभासद नोंदणी गांभीर्यपूर्वक घेतली आहे. नेते मंडळींनीही हे गंभीरपणे घेतले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेत यश मिळवण्यासाठी बाहेर गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. जूनपासून निधी मिळणार आहे. पण; पूर्वीसारखा नाही. लाडकी बहीण, शेती पंपाचे वीज, नोकर पगार, पेन्शन, ग्रॅज्युएटी आदि कामांसाठी मोठ्या निधीची तरतूद करावी लागते. त्यासाठी राज्याचे उत्पन्न उत्पन्न वाढवावे लागेल. कर वाढवावे लागतील. आत्ताचे राजकारण हे कुबड्या घेऊन करण्याची वेळ नाही. त्यासाठी सभासद नोंदणी मोठ्या संख्येने झाली पाहिजे, असेही ते शेवटी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांच्या नेतृत्वाखाली उच्चांकी सभासद नोंदणी करून या मोहिमेत कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर एक येण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घ्यावे. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, यांची भाषणे झाली.
व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, मानसिंगराव गायकवाड, युवराज पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, शशिकांत खोत, चंद्रकांत गवळी, सूर्यकांत पाटील, वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, मधुकर जांभळे, सौ. शितल फराकटे, अनिल साळुंखे, बाळासाहेब देशमुख, जयसिंग चव्हाण, पंडितराव केणे, रामापा करीगार, विकास पाटील, शिवाजी देसाई, शिरीष देसाई, दीपक देसाई, आदिल फरास आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत युवक जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे यांनी केले. कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील- कुरुकलीकर यांनी प्रास्ताविक केले. विशाल बेलवळेकर यांनी सूत्रसंचालन केले. कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनी आभार मानले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, दहशतवाद्यांच्या आडून कुरापत करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलाच धडा शिकविला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे अभिनंदन करणारा ठराव मुश्रीफ यांनी मांडला. उपस्थितांनी या ठरावाला जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
कागलमध्ये आयोजित कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेच्या आढावा मेळाव्यात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व समोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.