ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
नवी दिल्ली : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीने ही नियुक्ती झाली असून, पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्राशी निगडित घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था भारतीय पत्रकारितेतील नैतिक मूल्यांचे संरक्षण, प्रसारमाध्यमांवरील देखरेख, तसेच माध्यम कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी जबाबदार असते. ही संस्था देशातील पत्रकारितेच्या स्वतंत्रतेला बळकटी देणाऱ्या काही प्रमुख संविधानिक यंत्रणांपैकी एक मानली जाते.
खासदार नरेश म्हस्के यांची ही नियुक्ती महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः ठाण्यासाठी अत्यंत गौरवाची बाब मानली जात आहे. स्थानिक पातळीवर नगरसेवक, महापौर म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध सामाजिक, नागरी आणि विकासाच्या कामांमध्ये सक्रीय सहभाग घेतलेला आहे. आता माध्यम क्षेत्राशी निगडित या राष्ट्रीय पातळीवरील भूमिकेतून ते स्वच्छ, उत्तरदायी आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना खासदार म्हस्के म्हणाले, "प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया हे एक महत्त्वाचे राष्ट्रीय व्यासपीठ असून, यामार्फत देशातील पत्रकारितेची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. माध्यमांची जबाबदारी आणि समाजातील त्यांच्या भूमिकेची जाणीव लक्षात घेऊन मी ही नवी जबाबदारी पार पाडणार आहे."
प्रेस कौन्सिलमध्ये सदस्य म्हणून खासदार म्हस्के यांचा समावेश झाल्याने माध्यम विश्वातील धोरणात्मक चर्चांमध्ये ठाण्याचा आवाज पोहोचेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.