सूर्यकुमार यादवची वडिलांसाठी भावनिक पोस्ट
अशोक कुमार यादव BARC मधून निवृत्त
मुंबई : सूर्यकुमार यादवचे वडील अशोक कुमार यादव यांनी भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदावरून निवृत्ती पत्करली आहे. त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने सूर्यकुमारने सोशल मीडियावर एक खास भावनिक पोस्ट शेअर केली असून ती सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
सूर्यकुमार यादवने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे
"माझे पहिले सुपरहिरो, माझे मार्गदर्शक आणि माझ्या आयुष्याची प्रेरणा... तुमची एक शानदार इनिंग आता पूर्ण झाली आहे. आता पुढच्या इनिंगसाठी तयार होण्याची वेळ आली आहे, जी थोडी अजून आरामदायी असेल."
या ओळींमधून सूर्यकुमार यादवच्या वडिलांप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि आदर स्पष्टपणे दिसून येतो. अनेक मुलाखतींमध्येही सूर्यकुमारने यापूर्वी नमूद केले आहे की, लहानपणापासून क्रिकेटकडे वळण्यासाठी आणि सातत्याने प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे वडीलच मुख्य कारण होते.
अशोक कुमार यादव यांनी आपल्या सेवाकाळात विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. BARC सारख्या देशातील अग्रगण्य संस्थेमध्ये त्यांनी आपली सेवा दिली, हे त्यांच्या कार्यकुशलतेचे प्रतिक मानले जात आहे.
निवृत्तीनंतरच्या काळात आता ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार असून, आयुष्यातील ही नवी ‘इनिंग’ अधिक शांत, समाधानकारक आणि आनंददायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या सोशल मीडियावरही सूर्यकुमारच्या या पोस्टला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी अशोक कुमार यादव यांना निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या असून, त्यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे मत मांडले आहे.