दिवा स्टेशनपासून १५० मी. रस्ता फेरीवाला व ट्रॅफिकमुक्त करा

 


शिवसेना उपशहर प्रमुख ॲड. आदेश भगत यांची पालिकेकडे मागणी

दिवा \ आरती परब : दिवा स्टेशन जवळील पूर्व परिसरात होणारी वाहतूककोंडी सर्वश्रूत असून स्टेशन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फेरीवाल्यांमुळे व बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नागरिकांना येथून मार्ग काढणे कठीण झाले आहे. दिवा शहरात स्थायिक झालेला बहुतांशी नागरिक हा मध्यमवर्गीय असल्याने ९० टक्केपेक्षा जास्त नागरिक हा रेल्वेने प्रवास करतो, परिणामी दिवा स्टेशन परिसर नेहमी गजबजलेला असतो. रेल्वे स्थानकात होणारी गर्दी व रेल्वे परिसरात रिक्षा, बस व छोटे मोठे व्यापार करणारे व्यापारी यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात कठोर आदेश देऊन मध्य रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर परिसर हा फेरीवाला मुक्त, ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले. 



माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवा स्टेशन परिसर फेरीवाला व ट्रॅफिक मुक्त ठेवण्यासाठी १५० मीटर परिसरातील फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर कठोर कारवाईची मागणी शिवसेना उपशहर प्रमुख ॲड. आदेश भगत यांनी सहायक आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसेच दिवा स्टेशन पूर्व परिसरात उड्डाण पुलासाठी उभे करण्यात आलेल्या शेवटच्या पिलरजवळ रस्ता अरुंद झाला असून त्या पिलरपासून दिवा चौकापर्यंत फेरीवाल्यांना मागे जाण्याचे निर्देश देऊन तिथे रस्ता करावा जेणेकरून त्याभागात ट्रॅफिक होणार नाही व नागरिकांना येण्या जाण्यास कोणताही अडथळा होणार नाही, अशी मागणी देखील ॲड. आदेश भगत यांनी केली आहे.






Post a Comment

Previous Post Next Post