दिवा \ आरती परब : कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभेतील पिसवली येथील जिल्हा परिषद शाळेस भेट दिली. तसेच शाळेतील चिमुकल्यांशी प्रेमाने संवाद साधला. शिवाय, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून शाळेची प्रगती, सोईसुविधा, समस्या व अडचणी याविषयी सविस्तर माहिती घेतली. सदर चर्चा सत्रात शाळेतील ४० हजार विजबिल थकीत असल्याने शाळेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची बाब निदर्शनास येताच त्वरित वीज भरणा करून वीजपुरवठा सुरळीत केला. शाळा भेटीचे औचित्य साधून पहिल्या दिवशी शाळेत दाखल झालेल्या चिमुकल्यांचे स्वागत करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक १६ ते २६ जून या कालावधीत ‘’चला शाळेत जाऊया’’ हा उपक्रम राबविला जात आहे. शाळा म्हणजे विद्यार्थी घडवणारे संस्कार केंद्र आहे. त्या केंद्रातून बाहेर पडणारी पिढी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा निर्माण करते. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते.
