तुंबलेल्या पाण्याचा निचरा करायला पोहोचला पालिकेचा जेसीबी
दिवा \ आरती परब)म : दिवा स्टेशन रोड बँगलोर बेकरी पासून ते प्रमोशन युनिफॉर्म पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर गटारच अस्तित्वात नसल्याने सर्व पाणी हे रस्त्यावरच साठून राहत होते. शाळकरी मुलांना या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत होता. याबाबत काल ट्विटरच्या माध्यमातून ठाणे महानगर पालिका आयुक्तांना तक्रारीतून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी दिवा मनसे कडून करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी ठाणे महानगर पालिकेकडून येथे जेसीबी पाठवून कामाला सुरुवात करण्यात आली.
दिवा स्टेशन ते अगदी दिवा टर्निंगपर्यंत या मुख्य रस्त्यावर नीट गटार नाही. दिव्यातील पूर्व पश्चिम जोडणार उड्डाणपूल बांधण्यासाठी २२ इमारती तोडण्यात आल्या. त्यामुळे त्याच्या खाली असणारी गटार लाईन पूर्णपणे रस्त्याखाली दाबली गेली. नंतर पालिकेने गटारे बांधायला घेतल्यावर प्रत्येक जागा मालकाने जागा न दिल्याने ते गटाराचे काम अर्धवट राहिल्याने मुख्य रस्त्यावर पावसामुळे दोन ते तीन फूट पाणी साचते आहे. त्यातूनच नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक येजा करतात. तेथेच फेरीवाले स्वतः भाजी, फळे विक्री करतात.
हे बघून मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे यांनी काल ट्विटरच्या माध्यमातून ठाणे महानगर पालिका आयुक्त सौरव राव यांना तक्रारीतून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आज दिवा प्रभाग समितीचे बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी स्वतः त्या पाणी साठणाऱ्या जागी जाऊन पाहणी केल्यावर लगेचच जेसीबी मागवून माती आणि गाळ काढला गेला. त्यानंतर तो रस्ता स्वच्छ झाल्याने नागरिकांनी आणि मनसेने पालिकेचे आभार मानले. तर पाण्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जागामालक पांडुरंग भोईर यांंनी पाईप टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे मनसेने विशेष आभार त्यावेळी मानले.

.jpeg)