मेट्रो मार्गांच्या विस्तारामुळे उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरच्या नागरी जीवनात क्रांती
अंबरनाथ \ अशोक नाईक : ठाणे जिल्ह्यातील उपनगरांना मुंबई मेट्रोशी जोडण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि एमएमआरडीएकडून महत्त्वाकांक्षी योजना आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मेट्रो मार्ग ५ आणि मेट्रो मार्ग १४ चा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावित रूटमुळे उल्हासनगर, अंबरनाथ आणि चिखलोलीसह बदलापूर या परिसरांना थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून, यामुळे या शहरांचा विकास अधिक वेगाने होईल.
मेट्रो मार्ग ५ (ठाणे – भिवंडी – कल्याण) यामध्ये आता कल्याण पश्चिमेकडे विस्तार करताना गुरुदेव हॉटेल, खडकपाडा, दुर्गाडी सिग्नल, बिर्ला कॉलेज, शहाड, आणि सुभाष चौक (भवानी चौक) ही प्रमुख स्थानके जोडण्यात येणार आहेत. सुभाष चौक हे या योजनेत मुख्य इंटरचेंज पॉइंट म्हणून ओळखले जाणार असून, येथून दोन स्वतंत्र मेट्रो मार्ग पुढे वाढवले जाणार आहेत.
पहिला मार्ग सुभाष चौक ते उल्हासनगर – अंबरनाथ – चिखलोली असा प्रस्तावित असून, याचे पुढे बदलापूरकडे विस्तार करण्याचा विचार सुरू आहे. या मार्गाची मेट्रो १४ शी जोडणी करण्यात येणार असून, यामुळे संपूर्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पूर्व भागातील प्रवाशांना थेट मेट्रो सुविधा मिळणार आहे. दुसरा मार्ग सुभाष चौक ते कल्याण पश्चिम – गुरुदेव हॉटेल असा असून, याला मेट्रो १२ शी जोडले जाणार आहे, ज्याचा उद्देश ठाणे शहर आणि कल्याण दरम्यानचा प्रवास सुकर करणे हाच आहे.
या संपूर्ण योजनेतील एक मोठा वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा म्हणजे मेट्रो व रेल्वे स्थानकांची परस्पर जोडणी. म्हणजेच, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड, चिखलोली आदी रेल्वे स्थानकांवरच मेट्रो स्थानकांची जोडणी केली जाईल. त्यामुळे प्रवाशांना एका वाहतुकीच्या माध्यमातून दुसऱ्याकडे सहजपणे जाता येणार असून, रेल्वेवरचा ताणही काहीसा कमी होईल. विशेषतः अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावित मेट्रो स्थानकामुळे येथील नागरिक, कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या मार्गामध्ये काही प्रमुख स्थानके अशी असतील – शहाड, बिर्ला कॉलेज, खडकपाडा, दुर्गाडी, सुभाष चौक, उल्हासनगर कॅम्प ३ आणि ५, अंबरनाथ, आणि चिखलोली. ही स्थानके शहरी आणि उपशहरी भागांतील घनवस्तीमध्ये असल्यामुळे प्रवाशांची संख्या लक्षणीय असेल, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.
या प्रकल्पाला अंतिम तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच भूसंपादन आणि प्रत्यक्ष कामास गती मिळणार आहे. या मेट्रो मार्गाच्या उभारणीत PM GatiShakti योजना, नगरविकास विभागाचा निधी आणि MMRDA ची योजना यांचा समावेश असेल.
अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरसारख्या उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वसाहती वाढल्या आहेत. परंतु आजपर्यंत मेट्रोशी थेट जोडणी नव्हती. त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी-व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रचंड वेळ प्रवासात वाया घालावा लागत होता. आता या नव्या मेट्रो मार्गांमुळे त्यांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता येणार आहे.
या प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे ठाणे जिल्ह्यातील पूर्वेकडील शहरांचा झपाट्याने विकास होणार असून, पर्यावरणपूरक आणि सुसज्ज वाहतूक व्यवस्था निर्माण होणार आहे. या मेट्रोच्या आगमनामुळे फक्त प्रवासच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्था, नोकरीच्या संधी, आणि रिअल इस्टेट सेक्टर यांनाही नवे बळ मिळणार आहे.
