ठाण्याच्या प्रतिनिधित्वाला मिळाली राष्ट्रीय पातळीवर मान्यता
नवी दिल्ली / ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांना त्यांच्या संसदेतील उल्लेखनीय कार्यगतीसाठी ‘संसदरत्न पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले आहे. १५व्या संसदरत्न पुरस्कार वितरण समारंभात नरेश म्हस्के यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसदेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशभरातील खासदारांमध्ये त्यांचा समावेश झाल्याने ठाण्याच्या प्रतिनिधीत्वाला अभिमानास्पद ओळख मिळाली आहे.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर भावूक होत म्हस्के म्हणाले, "आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. एका सामान्य शिवसैनिकापासून ते संसदरत्न पुरस्कार मिळवणारा खासदार असा प्रवास शक्य झाला तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे आणि जनतेच्या विश्वासामुळेच." हा सन्मान माझा नसून माझ्या ठाणेकर जनतेचा आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे मी संसदेत ठाण्याचा आवाज बुलंद करू शकलो. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करत राहीन."
संसदरत्न पुरस्कार म्हणजे काय?
या पुरस्काराद्वारे खासदारांचे प्रश्न विचारणे, चर्चा, समिती कामगिरी आणि संसदीय सहभाग या निकषांवर मूल्यांकन करून त्यांचा गौरव केला जातो. हा पुरस्कार खासदारांना त्यांच्या पारदर्शक, निष्कलंक आणि लोकहितासाठीच्या कामगिरीबद्दल दिला जातो.
ठळक मुद्दे:
▪️ ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना दिल्लीच्या पातळीवर मिळाली दखल
▪️ संसदेमध्ये चर्चांमध्ये सक्रिय सहभाग, प्रश्न उपस्थित करण्याची आघाडी
▪️ नागरी सुविधा, वाहतूक, आरोग्य आणि युवकांसाठी विशेष योजना प्रभावीपणे मांडल्या
▪️ शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांना राष्ट्रीय गौरव
खासदार म्हस्के यांचा ठाणेकर जनतेकडून गौरव
या पुरस्कारामुळे ठाण्यातील शिवसैनिक, मतदार आणि सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव केला.


