ग्रामपंचायतींना तात्काळ कारवाईचे निर्देश
जळगाव / जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease - LSD) चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय सभा आयोजित करण्यात आली. या बैठकीत पशुधनाचे रक्षण व ग्रामस्तरावर स्वच्छतेच्या माध्यमातून LSD आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना खालील महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले:
✅ ग्रामपंचायतमार्फत गोठ्यांची फवारणी:
गोठ्यांमध्ये कीटक व विषाणू नियंत्रणासाठी नियमितपणे कीटकनाशक व जंतूनाशक फवारणी करण्याचे आदेश.
✅ परिसर स्वच्छता मोहिमा:
गोठ्यांच्या आणि आजूबाजूच्या परिसरात नियमित स्वच्छता राखणे, नाल्यांची स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती मोहिमा आणि पाण्याचा साच न होऊ देणे यावर भर.
✅ LSD नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना:
रुग्ण जनावरांचे विलगीकरण, औषधोपचार उपलब्ध करणे, स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी समन्वय, व चोख देखरेख.
✅ मृत जनावरांच्या carcass ची शास्त्रोक्त विल्हेवाट:
रोगग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास त्वरित माहिती देणे, पर्यावरणस्नेही पद्धतीने विल्हेवाट लावणे, आणि गंध व संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे.
या बैठकीत डॉ. प्रदीप झोड (उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग) यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना LSD विषाणूचा प्रसार, प्रतिबंधक लसीकरण, स्वच्छता उपाय, आणि प्रशासनाने घ्यावयाच्या तांत्रिक बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “LSD आजारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींनी आणि संबंधित यंत्रणांनी सजगपणे काम करणे आवश्यक आहे. ही केवळ आरोग्याची नाही, तर आर्थिक स्थैर्याशी जोडलेली बाब आहे.”
तसेच जिल्हा परिषदेने जनजागृतीसाठी पोस्टर, गावपातळीवरील बैठकांचे आयोजन आणि वैद्यकीय पथकांची रचना करण्याचे निर्देशही दिले आहेत. प्रशासनाच्या सज्जतेबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी विश्वास दिला असून, LSD नियंत्रणासाठी "ग्राम पातळीवरून जिल्हा पातळीपर्यंत एकसंघ कृती आराखडा राबवण्यात येईल", असे ठरले आहे.
