भाजप दिवा मंडळाची तातडीच्या कारवाईची मागणी
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील स्टेशन परिसरात असलेल्या तलावाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून, तलावामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक, सांडपाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टी, दिवा शहर मंडळाचे अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी दिवा प्रभाग समिती व महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तलावाच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. याचा फटका परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
भाजप दिवा मंडळाच्या वतीने तलावाची तातडीने स्वच्छता करून कचरा काढून टाकावा, तसेच भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी नियमित देखभाल व स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या गंभीर विषयाकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतो, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

