वडाळ्यात लिफ्ट शाफ्टमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra WebNews
0


मुंबई : वडाळ्यातील बालाराम खेडेकर मार्गावरील 'मातोश्री सदन' या नव्याने उभारलेल्या इमारतीत ५५ वर्षीय प्रकाश नामदेव शिंदे यांचा १८व्या मजल्यावरून उघड्या लिफ्ट शाफ्टमध्ये पडून मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. ही दुर्घटना १३ जुलै रोजी पहाटे ३:४५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, यामुळे इमारतीतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


प्रकाश शिंदे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसांपासून इमारतीच्या गॅलरीत झोपत होते. पहाटे लघवीला जाण्याची गरज भासल्यानंतर ते उठून घराबाहेर आले आणि लिफ्टजवळ गेले. मात्र लिफ्टचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने, ती जागा पूर्णपणे उघडी होती. जागेवर अंधार असल्याने व लिफ्टशाफ्टला कुठल्याही प्रकारचा अडसर नसल्याने, तिथे बसण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि ते थेट १८ मजल्यांवरून खाली कोसळले.


सकाळी ८:५० वाजता काही रहिवाशांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. रफी अहमद किदवाई (RAK) मार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. शिंदे यांना तत्काळ खाली काढून केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण प्रकार स्पष्टपणे दिसून आला असून त्याचा तपास केला जात आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मातोश्री सदन' इमारतीचे बाह्य बांधकाम पूर्ण झाले असले तरी लिफ्टचे काम अद्याप बाकी होते. तरीही अनेक रहिवासी त्या इमारतीत वास्तव्यास होते. लिफ्ट शाफ्टसारख्या धोकादायक भागाला कोणतीही व्यवस्था न केल्यामुळेच ही जीवघेणी दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)