डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जलअडचणी दूर करण्यासाठी आणि दीर्घकालीन उपाययोजना म्हणून कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
आमदार मोरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र धरण मंजूर करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. या निवेदनप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार शरद सोनवणे हे देखील उपस्थित होते.
या प्रस्तावित धरणामुळे कल्याण-डोंबिवली महानगर क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या या परिसरात बहुतांश वेळा पाणीकपात, अपुरा पाणीपुरवठा आणि टँकर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या धरणाची मागणी ही नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
"कल्याण-डोंबिवलीसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरासाठी स्वतंत्र धरण मंजूर झाल्यास, जलसंकटाचा कायमस्वरूपी बंदोबस्त होऊ शकतो," असे आमदार मोरे यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत, लवकरच यासंबंधी सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.