दिवा \ आरती परब : आई एकविरा सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदा सलग १५ व्या वर्षी आई एकविरा माऊलीची पदयात्रा व पालखी कुलस्वामीनी मंदिर, दिवा पश्चिम ते एकविरा आई, श्री क्षेत्र कार्ला पर्यंत मोठ्या भक्तिभावात उत्साहात निघाली.
शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर २०२५ ते रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा पदयात्रा व पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दिवा स्टेशन, बंदर आळी, कुलस्वामिनी मंदिर, दिवा (प.), तालुका- ठाणे येथून पालखीची सुरुवात झाली.
आई एकविरा माऊलीची सजवलेली पालखी ब्रास बँडच्या सुमधुर संगीतावर भक्तांच्या जयघोषात मार्गस्थ झाली. ढोल- ताशे, ब्रास बँड, भगवे ध्वज, फुलांची उधळण आणि “आई एकविरा माऊलीचा जयजयकार” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसमय झाला होता. मोठ्या संख्येने भाविक, महिला, युवक आणि ग्रामस्थ या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
या पालखी सोहळ्याचे अध्यक्षपद जयेंद्र अशोक भगत यांनी भूषविले. पालखी प्रमुख म्हणून जितेंद्र अशोक भगत यांनी जबाबदारी सांभाळली. उपाध्यक्ष म्हणून प्रकाश पाटील, खजिनदार म्हणून गणेश साळुंखे व अल्पेश पाटील यांनी काम पाहिले. कार्याध्यक्ष देवेंद्र भगत, सल्लागार गणेश भगत यांच्यासह कार्यकारी मंडळ व पालखी सेवकांनी पालखीचे यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
१५ वर्षांची परंपरा लाभलेल्या या पालखी सोहळ्यामुळे दिवा परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. आई एकविरा माऊलीच्या कृपेमुळे ही पालखी शांततेत व यशस्वीरीत्या निघालीची भावना भाविकांनी व्यक्त केली.

