गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना तब्बल ९१० टन मोफत शाडू मातीचे वाटप



  • मुंबई महानगरपालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम 
  • के/पूर्व विभागात सर्वाधिक वाटप
  • आणखी मातीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध


मुंबई : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने नियोजनबद्ध पावले उचलली असून, मूर्तिकारांना तब्बल ९१० टन २३५ किलो शाडू मातीचे मोफत वाटप करण्यात आले आहे. २५ जुलै पर्यंत ही शाडू माती विविध विभागांमध्ये वितरित करण्यात आली असून, लहान मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांसाठी ही योजना फारच उपयुक्त ठरत आहे.

या उपक्रमांतर्गत के/पूर्व विभागात सर्वाधिक  ९६ टन ६१५ किलो, जी/उत्तर विभागात ९१ टन २० किलो, पी/उत्तर विभागात ८२ टन ४५५ किलो, डी विभागात ७४ टन २०० किलो, तर एफ/दक्षिण विभागात ७२ टन ६०० किलो शाडू मातीचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये एकूण २८५० पेक्षा अधिक मूर्तिकारांनी सहभाग नोंदवला आहे.


महापालिकेच्या पर्यावरण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने शहरातील विविध विभागीय गोदामांमधून मातीचे वाटप केले जात असून, ही प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. याबरोबरच, ज्या मूर्तिकारांना अधिक शाडू मातीची गरज आहे, त्यांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mcgm.gov.in या ठिकाणी ‘नागरिकांकरीता’ विभागामध्ये जाऊन, ‘अर्ज करा’ या रकान्यातील ‘मंडप (सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रोत्सव/इतर उत्सव)’ या पर्यायाद्वारे आपली मागणी नोंदवावी, असे आवाहन परिमंडळ २ चे उपायुक्त आणि श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.


महापालिकेच्या या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यास प्रोत्साहन मिळत असून, जलप्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरले आहे. अनेक मूर्तिकार आणि सामाजिक संस्थांनी यावर समाधान व्यक्त केले असून, अशा योजनांमुळे पर्यावरण आणि परंपरेचा समतोल राखला जात असल्याचे मत व्यक्त केले आहे.


 पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी मूर्तिकारांना ९१० टन शाडू मातीचे मोफत वाटप सुरू केले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तींना चालना देण्यासाठी पालिकेचा हा उपक्रम राबवला जात आहे.


महापालिकेच्या पर्यावरण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शाडू मातीचे वितरण सुरू असून, शहरातील विविध विभागांतील मूर्तिकार आणि मंडळांनी यासाठी नोंदणी केली आहे. या योजनेतून एकूण २,८५० पेक्षा अधिक मूर्तिकार लाभ घेणार आहेत, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.


महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शाडू मातीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही मोफत शाडू माती मूर्तिकारांना देण्यात आली आहे. शाडू मातीच्या मोफत वाटपासाठी शहरभरात महापालिकेने विभागीय गोदामे व वितरण केंद्रे उभारली असून, जुलै अखेरपर्यंत हे वाटप पूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेमुळे लहान मूर्ती बनवणाऱ्या घरगुती गणपती कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही मूर्तिकारांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शाडू माती महाग झाल्याने आर्थिक खर्चात मोठी भर पडत होती, पालिकेच्या या उपक्रमामुळे व्यवसायाला मोठा हातभार लागणार आहे.


महापालिकेने पुढील वर्षी योजनेत आणखी सुधारणा करून आणखी जास्त मूर्तिकारांना या योजनेत सहभागी करून घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. पर्यावरणप्रेमी व सामाजिक संघटनांनी पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, भविष्यात ही योजना आणखी व्यापक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post