दिवा / आरती परब : दिवा स्टेशन परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी आज दिवा प्रभाग समिती व मुंब्रा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोठी कारवाई करण्यात आली. सायंकाळी ५.३० ते ६.४० या वेळेत दिवा चौक ते दिवा स्टेशन रोडदरम्यान तब्बल ३५ ते ४० अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांचे हातगाड्या व विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई दिवा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांसोबत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या दिवा चौकीचे ४ अधिकारी, २० अंमलदार, RCP चे १३ जवान आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.
फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर ही संयुक्त कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या मोहिमेमुळे दिवा परिसरातील अतिक्रमणविरहित व्यवस्था निर्माण होण्यास हातभार लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.