दिवा- सीएसटीएम लोकल सुरू करण्यासाठी अश्विनी केंद्रे यांचे आमरण उपोषण

Maharashtra WebNews
0




शिवसेना ठाकरे गटाच्या योगिता नाईक यांनी दिला पाठिंबा

दिवा / आरती परब : दिवा- सीएसटीएम लोकल ट्रेन सुरू करण्याच्या मागणीसाठी समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आज शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने विधानसभा संघटिका योगिता नाईक यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. त्यांच्या सोबत प्रियांका भोईर, कविता कुंभार आणि महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग होता.

यावेळी केंद्रे यांच्याशी चर्चा करताना योगिता नाईक यांनी सांगितले की, "दिवा शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाख असूनही येथील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी दररोज जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागतो. शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेक प्रवाशांनी गाडीच्या दरवाज्यात लटकून प्रवास करताना आपला जीव गमावला आहे."

त्यांनी पुढे सांगितले की, अश्विनी केंद्रे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून न थकता दिवा शहरातील प्रवाशांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. "एक महिला म्हणून, दिवा शहराच्या नागरिक म्हणून त्यांचा लढा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे," असे सांगून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने त्यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिवा- सीएसटीएम लोकल सुरू करण्यासाठी आता सामाजिक आणि राजकीय स्तरावरूनही दबाव वाढताना दिसत असून, या आंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)