डॉ. अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन
श्री क्षेत्र आळंदीत ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’चे उद्घाटन
पुणे : “अध्यात्म आणि विज्ञानाचे एकत्रिकरण केल्यास भारत पुन्हा एकदा वैभवशाली बनू शकतो. मात्र, युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता थांबवून त्यांना भक्तीची नशा लावणे आवश्यक आहे, आणि हे कार्य केवळ वारकरी संप्रदायच करू शकतो. जेव्हा युवक ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांवर चालतील, तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनेल,” असे विचार चाणक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे आणि एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमानवाडी, आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित दोन दिवसीय ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद’ उदघाटन दीपप्रज्वलन करून झाले.
या प्रसंगी डॉ. धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी देहूचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बापूसाहेब मोरे, खांडबहाले डॉट कॉमचे निर्माते डॉ. सुनील खांडबहाले, पद्मश्री पोपटराव पवार, श्रीसंत नामदेव महाराज कीर्तन महाविद्यालयाचे जगन्नाथ महाराज पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. परिषदेचे संकल्पक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, तसेच यशोधन महाराज साखरे, रामकृष्ण महाराज, परिषदेचे समन्वयक योगेश पाटील व राष्ट्रीय सरपंच संसदेचे सहसमन्वयक प्रकाश महाले उपस्थित होते.
डॉ. धर्माधिकारी म्हणाले, “युवकांचे चारित्र्य घडविण्यासाठी वारकरी संप्रदाय अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षण हे केवळ ज्ञान देणारे न राहता, व्यक्तीमत्त्व व चारित्र्य घडविणारे असावे. ज्ञानोबा-तुकोबांनी भक्ती आणि शक्तीचा संगम साधत समाजाला दिशा दिली.”
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “कीर्तनकारांनी ज्ञानोबा-तुकोबांचा संदेश समाजात पोहोचवावा. आत्मा अविनाशी आहे, मन चंचल आहे. ते स्थिर करण्याचे ज्ञान ज्ञानेश्वरांनी दिले आहे.”
डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले की, “सरकारी यंत्रणा आणि वारकरी संप्रदाय यांच्यात ही परिषद दुवा निर्माण करणारी आहे. समाजाची आजची स्थिती पाहता वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील धार्मिक, सामाजिक शिस्त आणि परंपरा टिकवून ठेवल्या आहेत. वारी ही एक पॉवरहाऊस आहे.”
डॉ. राहुल कराड म्हणाले, “वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे अनेक नवे विषय परिषदेमध्ये चर्चिले जात आहेत. लोकजीवनातील समस्यांवर प्रभावी उपाय सुचविण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार आहे.”
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, “समाज संघटित ठेवण्याचे काम वारकरी संप्रदाय करत आहे. आज पर्यावरण, मातीचे आरोग्य आणि व्यसनाधीनता या मोठ्या समस्या आहेत. यावर उपाय म्हणून ज्ञानेश्वरी आणि संत परंपरेचा आधार आवश्यक आहे.”
जगन्नाथ महाराज पाटील म्हणाले, “ही परिषद म्हणजे कल्याणाच्या मार्गावर चालणाऱ्यांचे दर्शन घेण्याची संधी आहे. १९३० मध्ये भारताच्या राजकीय भविष्यासाठी लंडनमध्ये गोलमेज परिषद झाली, आणि आज या परिषदेचा हेतू ‘विश्वकल्याण’ आहे.”
प्रास्ताविक करताना योगेश पाटील म्हणाले, “या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातून ६० कीर्तनकार व १५० सरपंच सहभागी झाले आहेत. समाजातील ज्वलंत समस्या सोडवण्यासाठी वारकरी संप्रदायच प्रभावी उपाय देऊ शकतो. संप्रदायाच्या अडचणी जाणून त्यांच्या निराकरणासाठी कृती आराखडा तयार केला जात आहे.”
यानंतर बापूसाहेब मोरे व डॉ. सुनील खांडबहाले यांनीही आपल्या भाषणात सांगितले की, “वारकरी संप्रदाय हे मानवजातीसाठी वरदान आहे. संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास समाजाचा कल्याण शक्य आहे.” या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शलिनी टोणपे यांनी केले.